कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार व डॉ. शैलेश वाढेर यांना राज्यस्तरीय सन्मान; विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची नवीन नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठित डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दोन वरिष्ठ प्राध्यापकांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत वर्ष २०२४-२५ साठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि वर्ष २०२५-२६ साठी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राध्यापकांच्या योगदानाचा गौरव करणे हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रशासकीय गतिशीलता व पारदर्शकता, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, संशोधन संस्कृतीचा विकास तसेच विविध शैक्षणिक भागीदारींच्या माध्यमातून गुणवत्तावाढीसाठी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची राज्य शासनाने घेतलेली दखल ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि कला शिक्षण संचालक डॉ. किशोर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उल्लेखनीय यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार व नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांचे अभिनंदन केले. तसेच व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभेचे सदस्य, विद्यापीठातील प्राध्यापक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या नेतृत्वाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ अशा सलग दोन वर्षांसाठी डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त होणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या सन्मानामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक क्षेत्रातील बहुमान निश्चितच अधिक उंचावला आहे,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि डॉ. शैलेश वाढेर यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान आम्ही आमचे विद्यार्थी, सहकारी आणि समाजाला समर्पित करीत आहोत. नियमित अध्यापन, संशोधन आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हीच आमची खरी ओळख आहे. दोन्ही प्राध्यापकांना मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला बळ देणारा असून, विद्यापीठ कार्यक्षेत्रात उच्च शिक्षणाची गुणवत्ता अधिक दृढ करण्यासाठी तसेच प्राध्यापकांना उत्कृष्ट कार्याची प्रेरणा देण्यासाठी ही उपलब्धी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. Kanthak Suryatal Post Views: 737 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शासकीय आश्रमशाळा कुपटीच्या माजी विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड; शाळेकडून भावी गुरुजींचा सत्कार