नांदेड – लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा देशमुख येथील विद्यार्थीदेखील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या मदतीने अभ्यासक्रमातील विविध पाठ्यघटक आनंददायी आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मला व्हायचंय अंतराळवीर या पाठ्यघटकानुसार विद्यार्थ्यांना एआयच्या मदतीने अंतराळाची सफर घडवून आणली. तसेच अनेक संकल्पना सहज आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बडवणे, सहशिक्षक संतोष घटकार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगता येतात. चित्रे, व्हिडिओ, प्रश्नोत्तरे, गोष्टी आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास अधिक मनोरंजक होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात तसेच नवीन माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. विशेषतः मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांच्या अध्ययनामध्ये एआयचा उपयोग प्रभावीपणे करता येतो. गणितातील उदाहरणे सोडवणे, इंग्रजी शब्दांचे उच्चार व अर्थ समजून घेणे, विज्ञानातील संकल्पना चित्रांच्या माध्यमातून शिकणे आणि मराठी भाषेतील वाचन-लेखनाचा सराव करणे यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळते.
एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते. शिक्षकांसाठीही एआय हे एक उपयुक्त शैक्षणिक साधन ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार सराव प्रश्न, उपक्रम आणि अध्ययन साहित्य तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. मात्र एआयचा वापर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. उच्च प्राथमिकसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी एआय कडून मिळालेली माहिती समजून घेऊन, तिची पडताळणी करून आणि स्वतः विचार करून शिकणे आवश्यक आहे, असे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे म्हणाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा देशमुख येथील विद्यार्थ्यांचा एआय च्या माध्यमातून सुरू असलेला हा शैक्षणिक प्रवास ग्रामीण भागातील शिक्षणात तंत्रज्ञानाचा सुंदर आणि सकारात्मक वापर दर्शवतो. “तंत्रज्ञानाची साथ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन” यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील डिजिटल युगासाठी सक्षम बनवण्यास निश्चितच मदत होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.
– प्रलोभ कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी, लोहा
