नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी सलग धडक कारवाई करत तब्बल ३३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, नागापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात बोटी व तराफ्यांच्या साहाय्याने अवैधरीत्या रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांसह पथकाने घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच रेती उपसा करणारे तीन ते चार इसम नदीपात्रातून पोहत पलीकडील किनाऱ्याकडे पसार झाले. घटनास्थळी पाहणी केली असता दोन मोठ्या लोखंडी बोटी किंमत ३० लाख रुपये, पाच तरंगते तराफे, तराफ्यांवरील सुमारे १० ब्रास रेती किंमत ५० हजार रुपये, तसेच पाच मोठे टोपले व तीन खोरे असा मुद्देमाल आढळून आला. बोटी व इतर साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३३ लाख ५१ हजार ९०० रुपये असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, २८ ते ३० ऑगस्टदरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध धंदे व गौण खनिजांविरोधात केलेल्या चार स्वतंत्र कारवायांमध्ये अंदाजे ५३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे व पोलीस अंमलदार भगवान टिपसरे, भिसे, तेलंग, गफार शेख, कल्याणकर आणि पवार यांच्या पथकाने केली. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीमुळे नदीपात्र तसेच पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे नांदेड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 598 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शासकीय रुग्णालयात बहिणीच्या मृत्यूने संताप; भाऊ बालाजी गायकवाड यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आत्मदहनाचा इशारा तोटंबा येथे अपघात होऊन मरण पावलेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा खरा जबाबदार कोण?