तोटंबा येथे अपघात होऊन मरण पावलेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा खरा जबाबदार कोण?

 

हदगाव-तोटंबा मार्गावरील भीषण अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

हिमायतनगर (प्रतिनिधी)- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे जीप चालविताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या सागाच्या झाडांना धडकून पलटी झाल्याची भीषण घटना हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चालकाचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या विशेष अहवालात नमूद आहे. तसेच पाच जण जखमी झाले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, AP 25 AH 6747 क्रमांकाची महिंद्रा कंपनीची जीप  हुडी ते तोटंबा जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होती. घाट संपल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या सागाच्या झाडांना जीपने जोरदार धडक दिली. त्यानंतर जीप पलटी झाली.

या दुर्घटनेत थुम सायन्ना शिवन्ना (६५), थुम गोराबाई चंदर (६५) आणि अब्दुल्ला गंगाधर नरसिमल्लू (६०) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पार्डी मंडळ, कुबेर, ता. मुधोळ, जि. निर्मल (तेलंगणा) येथील रहिवासी असल्याचे अहवालात नमूद आहे.

अपघातात व्यापर मोनाजी कानोबा (६५), सुनगुरी शंकर भोजन्ना (६८), पुष्पाबाई रामाराव गड्डे (५०), थुम मतुबाई सायन्ना (५८) आणि पंडलीक बरलाम रामलू (६५) हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी तलशीराम पटेल गंगाधर पटेल (२७), रा. पार्डी मंडळ, कुबेर, ता. मुधोळ, जि. निर्मल (तेलंगणा) याच्याविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहवालानुसार आरोपी चालकाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास सपोनि रमेश बी. जाधवर करीत असून, पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

कालबाह्य वाहनांना रस्त्यावर परवानगी देणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी निश्चित करा!

अपघातग्रस्त जीपची पाहणी केली असता तिची मुदत संपलेली असून वाहनातील विविध भाग अत्यंत जुनाट व जीर्ण अवस्थेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. अशा धोकादायक आणि कालबाह्य वाहनांना रस्त्यावर धावण्याची परवानगी नेमकी कोणाच्या निष्काळजीपणामुळे मिळते, हा गंभीर प्रश्न या अपघातानंतर उपस्थित झाला आहे. वाहनांची नियमित तपासणी करून नियमबाह्य, अनफिट आणि मुदतबाह्य वाहने रस्त्यावरून हद्दपार करण्याची जबाबदारी आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या नजरेसमोरच अशी वाहने सर्रास धावत असतील, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. काहींच्या कथित आर्थिक हितासाठी जर कालबाह्य वाहनांना रस्त्यावर धावण्याची मुभा दिली जात असेल, तर त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मृत्यू, अपंगत्व आणि कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्याच्या रूपाने मोजावी लागते. त्यामुळे तोंडवा येथील या भीषण अपघाताची केवळ चालकाच्या चुकीपुरती चौकशी न करता वाहनाची फिटनेस, परमिट, विमा, मुदत आणि यापूर्वी झालेल्या तपासण्यांची संपूर्ण नोंद तपासून, अशा वाहनाला रस्त्यावर धावण्याची परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा निष्पाप जीवांचा बळी जाऊ नये, यासाठी आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने आता तरी कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून धडक मोहीम राबवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!