नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मरखेल पोलीस ठाण्याच्या पथकाने मरखेल ते देगलूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे व क्रूरतेने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना पकडून ८ गोवंशाची सुटका केली आहे. या कारवाईत वाहनांसह एकूण ७ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नाकाबंदी करून रचला सापळा

दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मरखेल पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मरखेल ते देगलूर रस्त्यावरून वाहनांमधून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ त्या मार्गावर सापळा रचला. संशयित दोन अशोक लीलँड वाहने येताच पोलिसांनी ती अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, वाहनांमध्ये जनावरांना अत्यंत निर्दयतेने दोऱ्यांनी बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

७.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस पथकाने पंचांसमक्ष खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • वाहने: अशोक लीलँड कंपनीचे वाहन क्र. MH-26 BE-8016 आणि अशोक लीलँड कंपनीचे वाहन क्र. TS-08 UD-3524 (दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत रु. ६,००,०००/-).
  • जनावरे: निर्दयतेने बांधलेली ०८ गोवंश जातीची जनावरे (अंदाजे किंमत रु. १,३७,०००/-).

चार आरोपींवर गुन्हे दाखल

या प्रकरणी पोलिसांनी खालील चार आरोपींविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. २१०/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे:

१. हनमंत भुलगडम (वय ४० वर्ष, व्यवसाय: चालक, रा. शेवाळा, ता. देगलूर)
२. सुनील मारोती नाईक (वय २६ वर्ष, व्यवसाय: चालक, रा. गळेगाव, ता. बिलोली)
३. माधव शंकर गायकवाड (वय ४६ वर्ष, रा. केसराळी, ता. बिलोली)
४. धोंडीबा पिराजी अंजनीकर (वय ४७ वर्ष, रा. हिप्परगा थडी, ता. बिलोली)

या आरोपींवर प्राण्यांना क्रूरतेने वागणूक अधिनियम कलम ११(१)(ड)(ई), प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायदा कलम ४७, ४७(अ), ४८, ५०, ५६(सी) तसेच मोटार वाहन कायदा (मोवाका) कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक व मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली मरखेल पोलीस ठाण्याचे सपोनि रवी खांडेकर आणि पोलीस अंमलदार दोसलवार व लोखंडे यांनी पार पाडली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

गोवंशाची अवैध वाहतूक, प्राण्यांवर क्रूरता किंवा कत्तलीच्या उद्देशाने संशयास्पद वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालया केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!