नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा मारहाण करून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनांक ७ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास वसरणा टी.ओ. संगम कार बाजार समूह मंगल परिसरात शंकर गवळी (वय ४०, रा. लोंढे सांगवी, ता. लोहा) यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकसदृश कठीण वस्तूने मारहाण करून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या घटनेनंतर इतवारा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सुजल उर्फ सुजित सुनील पोटभरे (वय २१, रा. श्रावस्तीनगर, नांदेड) याला ताब्यात घेतले. तोदेखील कचरा वेचण्याचे काम करत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. मात्र, आवश्यक कामानिमित्त ते बाहेर गेल्याने पुढील कारवाईची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे आणि पोलीस अंमलदार साहेबराव जगताप यांनी सांभाळली. पोलिसांनी आरोपी सुजल उर्फ सुजित पोटभरे याला न्यायालयात हजर करून गुन्ह्याच्या तपासाची प्रगती, घटनेमागील नेमके कारण, वापरण्यात आलेले हत्यार तसेच इतर बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद केला. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांनी आरोपीला १५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या खूनप्रकरणामागील नेमके कारण काय, आरोपीचा मृतकाशी पूर्वीपासून काही वाद होता का, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास इतवारा पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच या हत्येचे संपूर्ण गूढ उलगडणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,097 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमित शाहंच्या खुर्चीला हादरा? आरटीआयमधून पॅलेट गनचा मोठा खुलासा, सरकारचा खोटेपणा उघड! आंधळी महानगरपालिका : २०० फुटांचा फूटपाथ गायब, तरीही महानगरपालिका निद्रिस्त; कायदा फक्त गरिबांसाठीच?