नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील सामान्य नागरिक आणि हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात नेहमीच तत्पर असणारी महानगरपालिका आता एका मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेला तब्बल २०० फुटांपेक्षा जास्त लांबीचा फूटपाथ पूर्णपणे गायब झाला असून, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. श्रीमंतांना अभय, गरिबांवर अन्याय? डोळ्यांनी दिसणाऱ्या माहितीनुसारजवळपास २०० फुटांचा फूटपाथ अतिक्रमणामुळे दिसेनासा झाला आहे. या ठिकाणी दुकानदारांनी आपली दुकाने थेट फूटपाथवर वाढवली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, महानगरपालिकेचे कार्यालय शेजारीच असूनही इतके मोठे अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या नजरेस पडू नये, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे श्रीमंतांचे कोणी काही वाकडे करू शकत नाही ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. माठ फोडणारे शौर्य कुठे गेले? महानगरपालिकेच्या या दुटप्पी धोरणावर नागरिकांनी कडक शब्दांत टीका केली आहे. गेल्या वर्षी रस्त्यावर माठ विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब पती-पत्नीचे माठ प्रशासनाकडून भररस्त्यात फोडून टाकण्यात आले होते. मजुरी करणाऱ्या आणि गल्लीबोळात राहणाऱ्या सामान्य लोकांवर कारवाई करून आपली वाहवा मिळवण्यात प्रशासन पुढे असते, मात्र धनदांडग्यांच्या अतिक्रमणा समोर हेच प्रशासन हतबल का होते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. तक्रार करायची कोणाकडे? ऐकणार कोण भररस्त्यातील फूटपाथ गायब होऊनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दिवसभर घाम गाळून पोटाची खळगी भरणाऱ्या हातागाडीवाल्यांना कायद्याचा धाक दाखवणारी यंत्रणा इतक्या मोठ्या अतिक्रमणाकडे डोळेझाक कशी काय करू शकते? या परिस्थितीमुळे सामान्यांमध्ये असा संदेश जात आहे की, कायदा हा फक्त गरिबांसाठीच असतो. आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी दखल घेणार की अर्थपूर्ण शांतता पाळली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 759 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कचरा वेचणाऱ्या व्यक्तीच्या खूनप्रकरणी २१ वर्षीय आरोपीला पोलीस कोठडी नांदेडमधील इंदरजितसिंग बावरी खून प्रकरण: एका महिलेसह चार आरोपींना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी