नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची २४ तासांत कारवाई; जालना जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुणाला अटक
 
नांदेड (प्रतिनिधी)  – मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तुषार गोविंदराव राठोड यांना फोन करून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत नागपूर येथून अटक केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
 
दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास आमदार तुषार राठोड हे मुखेडहून नांदेडकडे प्रवास करीत होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. फोनवरून खंडणीची मागणी करत शिवीगाळ केली आणि खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकारानंतर आमदार राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार विविध पथकांकडून तपास सुरू करण्यात आला.
 
दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित आरोपी नागपूर शहरातील हसनबाग, नंदनवन परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने नागपूरला रवाना झाले. संबंधित परिसरात सापळा रचून शोधमोहीम राबविण्यात आली आणि संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
 
बाळासाहेब भास्कर राख असे आरोपीचे नाव असून तो २४ वर्षांचा आहे. तो मूळचा ढाकलगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना येथील रहिवासी असून सध्या हसनबाग, नंदनवन, नागपूर येथे राहत होता. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलीस प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे तसेच पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड आणि सुधाकर देवकते यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!