नांदेड,(प्रतिनिधी) – देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातील तब्बल ९ लाख ३६ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या प्रकरणाचा नांदेड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या धक्कादायक गुन्ह्यात फिर्यादीच्या मुलाचाच सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून त्याने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीच्या मदतीने चोरीचा कट रचल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी पत्रकार परिषदेत दिली. नायगाव येथील कौठेकर कुटुंबीय २६ जून रोजी देवदर्शनासाठी बाहेर गेले असताना त्यांच्या घरातील ९ लाख ३६ हजार ६०० रुपयांची रोकड चोरीस गेली होती. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि नायगाव पोलिसांनी समन्वयाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. चौकशीत फिर्यादीचा मुलगा शुभम कौठेकर यानेच आपल्या मैत्रिणीच्या मदतीने घरातील रोकड चोरल्याची बाब उघड झाली. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण ९ लाख ३६ हजार ६०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एका कारवाईत अर्धापूर आणि परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणत ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी भोकर फाटा परिसरात गस्त घालत असताना ट्रॅक्टरचे हेड चोरी करणाऱ्या टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महेश आखात (रा. सातोना, जि. जालना) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या भाऊ विष्णू आखात याच्या साथीने अर्धापूर, मालेगाव आणि इतर ठिकाणांहून दोन ट्रॅक्टरचे हेड चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचे दोन ट्रॅक्टर हेड जप्त करण्यात आले. या दोन्ही गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा आणि नायगाव पोलिसांच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी कौतुक केले.पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 1,074 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लाल कालीन आणि सीमेचे संकट: चीनचे आव्हान आणि भारताची स्थिती महिनाभरात १०,६०४ पानटपऱ्यांची झाडाझडती; ८० गुन्हे दाखल, १.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त