१२ लाखांची मागणी करून ६.४० लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर/जालना (प्रतिनिधी) – अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले अंबडचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून चव्हाण यांच्या निवासस्थानी आणि अन्य ठिकाणी झडतीची कारवाई सुरू आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच सहा हायवा टिप्परची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी एका ३६ वर्षीय तक्रारदाराकडे दीड लाख रुपये प्रतिदिन या दराने आठ दिवसांसाठी १२ लाख रुपयांची मागणी केली होती. याशिवाय सहा टिप्परच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, असे आणखी तीन लाख रुपये मागण्यात आले होते.

तक्रारदाराने यापूर्वी आरोपीला आठ लाख रुपये दिल्याचा दावा केला असून उर्वरित रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २६ मे २०२६ रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना पंचांसमक्ष तहसीलदार चव्हाण यांनी तडजोडीअंती ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ६ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कासलीवाल मार्वल सोसायटी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी विजय चव्हाण यांनी पंचांसमक्ष ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे विजय चव्हाण हे मूळचे नांदेडचे रहिवासी असून महसूल विभागात येण्यापूर्वी ते पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून कार्यरत होते. शासकीय सेवेत विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांनी महसूल विभागात प्रवेश केला होता. एसीबीने त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानाचीही झडती घेतली असून त्यातून काही महत्त्वाची कागदपत्रे व माहिती मिळाल्याची चर्चा आहे.

आरोपीच्या अंगझडतीमध्ये एक मोबाईल फोन, महागडे मनगटी घड्याळ, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक लॉकेट आणि ६ हजार ३७० रुपये रोख रक्कम आढळून आली. त्यांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांनी केले असून पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!