नांदेड पोलिसांचा छापा; तीन आरोपींना अटक, नांदेडसह गुजरात व पश्चिम बंगालमधील तीन पीडित महिलांची सुटका नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने मोर चौक परिसरात मोठी कारवाई केली. ग्रीन टी थाय स्पा सेंटर या नावाखाली सुरू असलेल्या कथित अवैध देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून नांदेड, वडोदरा (गुजरात) आणि जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) येथील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 59 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 24 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मोर चौक परिसरातील ‘ग्रीन टी थाय स्पा सेंटर’मध्ये अवैध देहव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि AHTU च्या पथकाने दोन शासकीय पंच व एका बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास बनावट ग्राहकाकडून ठरल्याप्रमाणे इशारा मिळताच पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. यावेळी पैशांचे आमिष दाखवून पीडित महिलांकडून अवैध देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. * गोविंद संभाजी सूर्यवंशी (वय 18 वर्षे), रा. बुद्ध विहाराजवळ, सांगवी, नांदेड. * महेश पांडुरंग कोकुलवार (वय 22 वर्षे), स्पा सेंटरचा मॅनेजर, रा. बालाजी मंदिराजवळ, सिडको, नांदेड. * परमिंदरसिंग चावला (वय 28 वर्षे), स्पा सेंटरचा मालक, रा. गुरुद्वारा गेट क्रमांक 01, महाराजा हॉटेलजवळ, नांदेड. स्पा सेंटरचा मालक आणि मॅनेजर पीडित महिलांना अधिक पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अवैध देहव्यवसाय करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नांदेड, वडोदरा (गुजरात) आणि जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) येथील एकूण तीन पीडित महिलांची सुटका केली. तसेच पंचांसमक्ष घटनास्थळावरून बनावट ग्राहकाने वापरलेल्या चलनी नोटा आणि मोबाईल असा एकूण 59 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार रतेश कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 703/2026 नुसार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 143(3), 3(5) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 4, 5 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार आणि ज्ञानोबा कवठेकर, तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, पोलीस अंमलदार अंकुश मोरे आणि यशोदा कर्डे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Kanthak Suryatal Post Views: 12 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मृत्यूची भीती आणि जगण्याची इच्छा यांचा संघर्ष उलगडणारे भयरात्र नाटक