संविधान दिन म्हणजे काय? २६ नोव्हेंबरलाच हा दिवस का साजरा केला जातो? यापूर्वी हा दिवस साजरा केला जात नव्हता का? भारतीय संविधानाची प्रास्ताविका म्हणजे काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हटले जाते? संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी भारतीय संविधानाचा इतिहास, त्याची निर्मिती आणि त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळे लोकशाही शासनव्यवस्थेचा भक्कम पाया घातला गेला. ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीत भारतातील मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. या राजवटीविरुद्ध भारतीयांनी दीर्घकाळ स्वातंत्र्यलढा दिला. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक महापुरुषांनी आंदोलने, उपोषणे, सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार लोकशाही तत्त्वांवर चालविण्यासाठी स्वतःची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी भारतीयांवर आली. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान सभेची स्थापना आणि कार्य भारताच्या स्वातंत्र्याचा आणि घटनात्मक भवितव्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ब्रिटिश सरकारने मार्च १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन भारतात पाठविले. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या सरकारने पाठविलेल्या या मिशनमध्ये लॉर्ड पेथिक-लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मिशनलाच त्रिमंत्री योजना असेही म्हटले जाते. कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेच्या स्थापनेची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. त्यानुसार जुलै १९४६ मध्ये संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेची मूळ सदस्यसंख्या ३८९ निश्चित करण्यात आली होती. यामध्ये ब्रिटिश भारतातील प्रांतांचे प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्यसंख्या २९९ झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथील सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेचे पहिले अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटनेची निर्मिती करणे आणि देशाच्या घटनात्मक शासनव्यवस्थेचा पाया घालणे हे संविधान सभेचे प्रमुख उद्दिष्ट होते. या कार्यासाठी संविधान सभेने विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या. त्यामध्ये मसुदा समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती होती. संविधानाचा मसुदा तयार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे सोपविण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय संविधानाचे शिल्पकार २९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. मसुदा समितीच्या मूळ सात सदस्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी. एल. मित्तर आणि डी. पी. खेतान यांचा समावेश होता. पुढे बी. एल. मित्तर यांच्या जागी एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच डी. पी. खेतान यांच्या निधनानंतर टी. टी. कृष्णमाचारी यांची समितीवर नियुक्ती झाली. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार बी. एन. राव यांनी संविधानाच्या प्रारूप निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. विविध समित्यांचे अहवाल, घटनात्मक सल्लागारांचे प्रारूप आणि संविधान सभेतील चर्चा व निर्णय यांच्या आधारे मसुदा समितीने संविधानाचा मसुदा तयार केला. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले. संविधानातील विविध तरतुदींचा सखोल अभ्यास करून त्यांची मांडणी करणे, विविध समित्यांच्या शिफारशींचा समन्वय साधणे आणि संविधान सभेतील चर्चांना घटनात्मक स्वरूप देणे यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य विद्वत्तेमुळे, कायदेविषयक ज्ञानामुळे आणि संविधान निर्मितीतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात येते. संविधान निर्मितीचे हे ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी संविधान सभेने २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस अथक परिश्रम घेतले. या काळात संविधान सभेची ११ अधिवेशने झाली. सखोल चर्चा, विचारविनिमय आणि विविध विषयांवरील मंथनातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली. २६ नोव्हेंबरलाच संविधान दिन का साजरा केला जातो? २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधानाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरला. संविधानातील काही तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच लागू झाल्या. मात्र, संविधानातील बहुतांश तरतुदी २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आल्या. या दिवसापासून भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनला. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी या तारखेला आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे. १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याच दिवशी पूर्ण स्वराज्याचा संकल्प साजरा केला होता. त्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून संविधान लागू करण्यासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही. पी. मेनन यांच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांतून देशातील ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळे देशात एकात्मिक घटनात्मक शासनव्यवस्था प्रस्थापित झाली. भारतीय संविधान : लोकशाही शासनव्यवस्थेचा पाया भारतीय राज्यघटनेच्या आधारावर देशातील संसदीय लोकशाही शासनव्यवस्थेची उभारणी झाली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधिमंडळे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये, निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांची रचना, अधिकार व कार्यमर्यादा संविधानाने निश्चित केल्या आहेत. भारतीय संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज आहे. देशाचा कारभार कोणत्या पद्धतीने चालविला जावा, शासनाच्या विविध अंगांमध्ये अधिकारांचे विभाजन कसे असावे, नागरिकांचे अधिकार कोणते असावेत आणि शासनसंस्थांच्या कार्यावर कोणत्या घटनात्मक मर्यादा असाव्यात, याची स्पष्ट मांडणी संविधानात करण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या मूळ स्वरूपात ३९५ अनुच्छेद, २२ भाग आणि ८ अनुसूच्या होत्या. कालांतराने विविध घटनादुरुस्त्यांद्वारे संविधानात बदल करण्यात आले. सध्या संविधानात १२ अनुसूच्या आहेत. भारतीय संविधान हे जगातील सर्वांत विस्तृत लिखित संविधानांपैकी एक आहे. संविधानाची प्रास्ताविका म्हणजे संविधानाचा आत्मा भारतीय संविधानाची उद्देशिका अर्थात प्रास्ताविका ही संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत मूल्ये स्पष्ट करणारा महत्त्वाचा भाग आहे. प्रास्ताविकेला संविधानाचा आत्मा असेही संबोधले जाते. प्रास्ताविकेत भारताचे स्वरूप, नागरिकांना मिळणारी मूल्ये आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली मूलभूत तत्त्वे यांचा समावेश आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय संविधानाची प्रमुख मूल्ये आहेत. भारतीय संविधानाच्या मूळ प्रास्ताविकेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द नव्हते. १९७६ मध्ये झालेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीने हे शब्द तसेच ‘राष्ट्राची एकता आणि एकात्मता’ यांचा समावेश प्रास्ताविकेत करण्यात आला. भारतीय संविधानाची प्रास्ताविका पुढीलप्रमाणे आहे. भारताचे संविधान उद्देशिका आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ; दर्जाची व संधीची समानता ; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश संविधान दिनानिमित्त देशभरात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाते. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संविधानाची ओळख करून देणे, त्यातील मूलभूत मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि लोकशाहीप्रती बांधिलकी दृढ करणे हा आहे. संविधानामुळे नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार मिळाले आहेत, त्यांची कर्तव्ये कोणती आहेत आणि देशाचा कारभार कोणत्या घटनात्मक चौकटीत चालतो, याची माहिती मिळते. कार्यपालिका, विधिमंडळ, न्यायपालिका, निवडणूक आयोग यांसारख्या घटनात्मक संस्थांची रचना आणि कार्यपद्धती समजून घेण्यास मदत होते. संविधान हे केवळ शासनव्यवस्थेचे मार्गदर्शक दस्तऐवज नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित असलेली मूल्यव्यवस्था आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार केल्यास जबाबदार नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ होते. संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये देशाच्या व राज्याच्या गरजांनुसार विविध कायदे केले जातात. हे कायदे संविधानाच्या चौकटीत असणे आवश्यक आहे. कायदे करताना त्यांची घटनात्मक वैधता आणि जनहिताच्या दृष्टीने उपयुक्तता विचारात घेतली जाते. संविधानाच्या तरतुदींचे पालन करणे ही शासनसंस्थांसह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाची किमान प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. संविधानाचे वाचन, त्यातील मूल्यांचे आकलन आणि दैनंदिन जीवनात त्या मूल्यांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. यासाठीच संविधान दिन साजरा करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात २००८ पासून संविधान दिन साजरा भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार २६ नोव्हेंबर २०१५ पासून देशभरात अधिकृतपणे संविधान दिन साजरा करण्यात येऊ लागला. मात्र, महाराष्ट्रात यापूर्वीच संविधान दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली होती. सन २००५ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी शाळांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संविधान फाऊंडेशन’ या संस्थेने संविधान जागृतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांना प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबर २००८ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंतच्या शासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्याची ही महत्त्वपूर्ण व्यवस्था होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने ४ फेब्रुवारी २०१३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील सर्व प्रकारच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे दररोज सामूहिक वाचन करण्याचे निर्देश दिले. तसेच संविधान जागृतीसाठी प्रश्नमंजुषा, निबंध, चित्रकला, घोषवाक्य, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख निर्माण होण्यास आणि समाजात लोकशाही मूल्यांची जाणीव रुजण्यास मदत होत आहे. संविधानिक मूल्यांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील आपल्या ऐतिहासिक भाषणात राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित केले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे केवळ राजकीय जीवनापुरती मर्यादित न राहता सामाजिक जीवनातही रुजली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. राजकीय लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे, हा त्यांचा मूलभूत विचार होता. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना कर्तव्यांची जाणीव ठेवणे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम साजरा करण्याचा दिवस नसून भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचे स्मरण करण्याचा, संविधान निर्मात्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि घटनात्मक कर्तव्यांची जाणीव दृढ करण्याचा दिवस आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, न्यायाची हमी आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला आहे. त्यामुळे संविधानाचे महत्त्व समजून घेणे, त्यातील मूल्यांचा अंगीकार करणे आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे. संविधानाचे वाचन करूया, संविधानातील मूल्ये जपूया आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध होऊया! – सुरेश पाटील सहायक संचालक, विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर. Kanthak Suryatal Post Views: 13 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खऱ्या अर्थाने बोध मिळवायचा असेल तर बोध कीर्तन पुस्तक वाचावेच लागेल