नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर राजूरकर यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा पक्षाला मिळावी अशी मागणी केली होती. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने राज्यातील १७ जागांच्या वाटपाचा निर्णय घेताना नांदेडची जागा भाजपला दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचा आदर राखत प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे. महायुतीचा धर्म पाळणे हे आमचे कर्तव्य आहे. पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असून अमर राजूरकर यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी एकजुटीने काम करतील, असे चिखलीकर यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही महायुतीतील एकोपा अधोरेखित केला. राज्यातील जागावाटप वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर निश्चित झाले असून तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाने अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले की, महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागांसाठी मागण्या होणे स्वाभाविक आहे. मात्र अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सर्वांनी करणे आवश्यक आहे. नांदेडमध्ये अमर राजूरकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना तिन्ही पक्षांचा पूर्ण पाठिंबा राहील. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना चव्हाण आणि चिखलीकर यांनी जिल्ह्यातील राजकीय मतभेदांवरही भाष्य केले. राजकारणात मतभेद असले तरी संवादातून प्रश्न सुटू शकतात, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांबाबत कोणतीही अट किंवा राजकीय सौदेबाजी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांपैकी भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेच पक्षमान्य उमेदवार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. इतर उमेदवार अपक्ष स्वरूपात निवडणूक रिंगणात असून उमेदवारी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत आणखी काही घडामोडी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयुक्त पत्रकार परिषदेमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विधान परिषद निवडणुकीत महायुतीची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 869 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हदगांव चे उपअभियंता दिलीप बोबडे अखेर कार्यमुक्त! भारत की डिजिटल संप्रभुता और ट्रंप व्यापार समझौता