गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात तापमानाचा पारा सतत चढत होता. दिवसभर कडक ऊन आणि रात्रीही जाणवणारी उष्णता यामुळे नागरिक हैराण झाले होते. एसी, कूलर आणि पंख्यांचाही विशेष उपयोग होत नसल्याने नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. शनिवारी दिवसभर तीव्र उकाडा जाणवत असतानाच सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात दाट ढग जमा झाले आणि काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी जाहिरातींचे फलक व होर्डिंग्ज हलल्याचेही दिसून आले. मात्र या बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात चिंता असली तरी सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसामुळे जमिनीतील उष्णता कमी होऊन शेतीच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र शेतीसाठी आवश्यक असलेल्या इंधन व इतर खर्चातील वाढीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.
