नांदेड – जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात. पात्र कुटुंबीयांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ॲड. हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मागील दीड वर्षात नांदेड जिल्ह्यात 244 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. ही बाब गंभीर असल्याचे नमूद करून ॲड. हेलोंडे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो आहे किंवा नाही, याची खातरजमा करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त प्रकरणांमध्ये मदत देण्यात आलेली प्रकरणे तसेच चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणांचा त्यांनी आढावा घेतला.
चारा टंचाई टाळण्यासाठी चारा लागवड करा
अल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय गायरान जमीन, शेताच्या बांधावर, जलसंधारणाची कामे झालेल्या नाल्यांच्या दुतर्फा चारा लागवड करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना ॲड. हेलोंडे पाटील यांनी दिल्या. आरोग्य विभागाने प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे समुपदेशन करावे. तसेच त्यांना आरोग्य सुविधा व आरोग्य शिबिरांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान, चारा लागवड, अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण आणि रोजगार मेळावे यांची माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आदी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्यावा. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मैदाने उपलब्ध करून द्यावीत. तसेच जिल्हा परिषद शाळांना टेलिस्कोप उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
अवैध सावकारीची प्रकरणे तातडीने निकाली काढा
अवैध सावकारीच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी संबंधित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. शासनाच्या विविध योजनांचे टोल फ्री क्रमांक ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागात लावावेत. विविध विभागांनी परस्पर समन्वय ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश ॲड. हेलोंडे पाटील यांनी दिले.
बैठकीत तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, पाझर तलाव, रेशीम लागवड, पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे व शेळी वाटप, अन्न सुरक्षा व पुरवठा तसेच सहकार विभागामार्फत बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालेला लाभ याबाबत संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी संयुक्त शिबिरे घ्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्व पात्र शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी एकत्रितपणे शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिरांच्या माध्यमातून पात्र कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. तसेच प्रत्येक विभागाने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले.
