प्रस्तावना आणि पार्श्वभूमी मानवी इतिहासातील नरसंहार ही सर्वात भयानक घटना असते. अमेरिकेतील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ग्रेगरी स्टॅंटन यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि अंथ्रोपोलॉजीमध्ये पीएचडी मिळवलेली आहे. त्यांनी जेनोसाईड वॉच (Genocide Watch) या संस्थेच्या माध्यमातून जगातील विविध नरसंहारांचा, जसे की जर्मनीमधील होलोकॉस्ट, आर्मेनिया आणि कंबोडियामधील नरसंहार, यांचा सखोल अभ्यास केला आहे. या अभ्यासातून त्यांनी नरसंहाराचे १० टप्पे (Ten Stages of Genocide) हा सिद्धांत मांडला आहे. हे टप्पे केवळ एकापाठोपाठ येणारे नसून, त्या अनेक प्रक्रिया आहेत ज्या एकाच वेळी घडू शकतात आणि म्हणूनच त्यांचे गांभीर्य अधिक असते. वर्गीकरण किंवा आदरिंग (Classification/Othering) नरसंहाराची पहिली पायरी म्हणजे समाजाचे आपण आणि ते (इतर) अशा गटांत विभागणी करणे. यात सातत्याने असा प्रयत्न केला जातो की, समोरचा गट आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. भारतात हे वर्गीकरण शिक्षित-अशिक्षित, टॅक्स पेअर-नॉन टॅक्स पेअर किंवा आरक्षणवाले विरुद्ध आरक्षण नसलेले अशा विविध स्तरांवर सुरू आहे. जाणीवपूर्वक ठराविक वर्गाला इतर ठरवून त्यांच्यासाठी भीमटे किंवा बाबासाहेबांची लेकरं (यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न झाला तर ..) यांसारखी संबोधने वापरली जातात. हिंदू-मुस्लिम संदर्भात मुल्ला किंवा लांडे यांसारख्या शब्दांचा वापर करून त्यांना आपल्यापासून वेगळे असल्याचे बिंबवले जाते.(हे सध्या तरी गप्प आहेत पण पुढे कार्य करतील याचा अंदाज लावता येणार नाही) प्रतीकीकरण (Symbolization) ज्यांना आपण इतर ठरवले आहे, त्यांचे काही चिन्हांमध्ये रूपांतर करणे म्हणजे प्रतीकीकरण होय. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या काळात कटेंगे तो बटेंगे किंवा एक हैं तो सेफ हैं यांसारखी पोस्टर्स याचाच भाग होती. यात टोप्यांच्या माध्यमातून ठराविक समुदायाला बाहेर काढले जाते. पंतप्रधानांच्या भाषणातील कपड्यांवरून ओळखणे किंवा स्मशान-कब्रस्तान आणि मंगळसूत्र काढून घेण्याबाबतची विधाने ही ‘इतर’ ठरवण्याच्या प्रक्रियेला बळ देतात. गुजरातमध्ये असताना दिलेली हम पाच, हमारे २५ सारखी विधाने सुद्धा याच प्रतीकीकरणाचा भाग होती. भेदभाव (Discrimination) तिसऱ्या टप्प्यात कायदे आणि रूढींचा वापर करून विशिष्ट गटांचे नागरी आणि मानवी हक्क नाकारले जातात. उदाहरणार्थ, ट्रिपल तलाकचा कायदा हा केवळ मुस्लिम महिलांना न्याय देण्याच्या नावाखाली आणला गेला, पण त्यात गुन्हेगारीकरण (Criminalization) करून पुरुषांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद केली गेली, ज्यामुळे त्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. याउलट, इतर धर्मांतील महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच CAA-NRC सारख्या कायद्यांतून ठराविक धर्माच्या लोकांना नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, जो संविधानातील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. बंगालमधील Special Intensive Revision (SIR) द्वारे लाखो लोकांचा मतदानाचा हक्क काढून घेणे हा याच भेदभावाचा एक भाग आहे. अमानवीकरण (Dehumanization) हा टप्पा अत्यंत घातक आहे, कारण यात ज्यांचा बळी घ्यायचा आहे, त्यांना ‘माणूस’ मानले जात नाही. त्यांना कुत्र्याची पिल्ले (Puppies), उंदीर, झुरळ किंवा कॅन्सर असे संबोधले जाते. नितेश राणे यांच्या भाषणातील हिरवे साप किंवा अमित शहा यांनी वापरलेला वाळवी (Termites) हा शब्द अमानवीकरणाची उदाहरणे आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्याला प्राणी किंवा रोग ठरवता, तेव्हा त्यांची हत्या करणे हे समाज स्वच्छ करणे वाटू लागते. हा टप्पा हत्याकांडासाठीचा बौद्धिक पाया रचतो. संघटन (Organization) नरसंहार हा नेहमी संघटित असतो. यासाठी द्वेषाचे गट (Hate Groups) आणि निमलष्करी शक्ती तयार केल्या जातात. भारतात बजरंग दल, दुर्गा वाहिनी, RSS आणि भाजपमधील काही नेते उघडपणे द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. स्वसंरक्षण शिबिरांच्या नावाखाली त्रिशूळ वाटप आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. अग्निवीर योजनेतून चार वर्षांनी निवृत्त होणारे सशस्त्र प्रशिक्षण घेतलेले युवक भविष्यात अशा संघटनांच्या कामासाठी वापरले जाण्याची भीती नाकारता येत नाही. ध्रुवीकरण (Polarization) ध्रुवीकरणाचा उद्देश समाजातील मध्यम वर्गाला, जो द्वेष रोखू शकतो, त्यांना लक्ष्य करणे हा असतो. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या या ध्रुवीकरणाला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी होत्या. दुसऱ्या बाजूला, अल्पसंख्याक समाजातील शिक्षित तरुणांना नोकऱ्यांपासून रोखणे किंवा त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून संपूर्ण समुदायाला भीतीचा संदेश देणे, हा या प्रक्रियेचा सहावा टप्पा आहे. पूर्वतयारी (Preparation) या टप्प्यात लोकांना मुख्य प्रवाहातून वेगळे (Eliminate/Separate) केले जाते. सीएए, एनआरसी आणि एसआयआर यांसारख्या सरकारी योजनांना कायद्याचे स्वरूप देऊन लोकांना वेगळे करणे हे सामान्य वाटू दिले जाते. हे सर्व सामाजिक दृष्ट्या विशिष्ट समुदायाला एकटे पाडण्यासाठी केले जाते. छळवणूक (Persecution) जेव्हा एखाद्याचे नागरिकत्व नाकारले जाते, तेव्हा त्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँकेतील खाते सर्व बंद होते. त्यांना शिक्षण आणि आरोग्यापासून वंचित ठेवले जाते. उमर खालिद आणि शर्जिल इमाम यांच्यासारखे तरुण पीएचडीधारक पाच-पाच वर्षांपासून विना खटला तुरुंगात सडत आहेत. फादर स्टॅन स्वामी यांना पार्किन्सन्स असतानाही पाणी पिण्यासाठी स्ट्रॉ नाकारला गेला आणि अखेर त्यांचा तडफडून मृत्यू झाला, हे छळवणुकीचे अत्यंत क्रूर उदाहरण आहे. नरसंहार (Extermination) हा निर्णायक टप्पा आहे, जिथे एक उन्मत्त झुंड प्रत्यक्ष हत्याकांडाला सुरुवात करते. या झुंडीला आधीच धर्माच्या आणि नॅशनॅलिटीच्या नावाखाली बौद्धिक नशा दिलेली असते. बंगाल निवडणुकीनंतर झालेली हिंसा ही अशाच प्रकारच्या उन्मादी जमावाचे उदाहरण आहे. आपण आता आठ टप्पे पार करून नवव्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. नकार (Denial) नरसंहार झाल्यानंतर किंवा सुरू असतानाही तो थेट नाकारणे, हा शेवटचा टप्पा आहे. यात घडलेल्या घटनांचे चुकीचे समर्थन केले जाते किंवा विरोधकांनाच दोषी ठरवले जाते. ही प्रक्रिया रोखण्यासाठी केलेले प्रयत्न सुद्धा धुडकावून लावले जातात. निष्कर्ष आणि आवाहन भारतातील सध्याची परिस्थिती पाहता, आपण नरसंहाराच्या प्रक्रियेतील अनेक टप्पे आधीच गाठले आहेत. जर्मनीने हिटलरच्या काळानंतर सलग तीन पिढ्या लज्जेने आणि गुन्हेगारी भावनेत घालवल्या आहेत. आपल्याला आपला देश आणि मानवता वाचवायची असेल, तर आजच सावध होणे गरजेचे आहे. ही हिंसा केवळ विनाशाकडे नेणारी आहे. जास्तीत जास्त लोकांनी या वास्तवाचा विचार करावा आणि हिंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी एकत्र यावे, हेच या देशाचे भविष्य वाचवण्याचे साधन आहे. सोर्स …. Kanthak Suryatal Post Views: 505 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पश्चिम बंगालमधील निवडणूक-उत्तर हिंसाचार: लोकशाहीची पायमल्ली आणि जंगलराजचा धोका;ममता बॅनर्जीला फसवण्याचा डाव युद्ध की दहलीज पर ईरान और अमेरिका;कल रात हुये बम हमले