नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागाबद्दल समाजात अनेक मतप्रवाह ऐकायला मिळतात. मात्र सुतावरून स्वर्ग गाठण्याची ताकद पोलिसांत असते ही म्हण काही निवडक तपासांमधून प्रत्यक्षात खरी ठरते. अशाच एका गाजलेल्या खूनप्रकरणात पोलिसांची बारकाईची तपासणी, सरकारी वकिलांची प्रभावी मांडणी आणि न्यायालयाने केलेली सूक्ष्म छाननी यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांची अभेद्य साखळी उभी राहिली. या साखळीवर विश्वास ठेवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. कोकरे यांनी दोन आरोपींना जन्मठेपेची (आजन्म कारावास) शिक्षा सुनावत प्रत्येकी ६५ हजार रुपये, म्हणजे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्राप्त माहितीनुसार, श्रीरंग पिराजी पवार यांचा मुलगा तुषार श्रीरंग पवार (वय १९) हा ७ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला. मात्र तो परतलाच नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही काहीच माहिती न मिळाल्याने १० डिसेंबर २०१९ रोजी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पोलिस अंमलदार प्रकाश मुंढे यांनी तुषारच्या मोबाईल कॉल डिटेल्सची तपासणी केली. त्यात शेवटचा फोन त्याच गावातील दिलीप बळीराम मिटकर याचा असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान दिलीपने सुरुवातीला अनभिज्ञता दर्शवली. मात्र पोलिसांनी तपासाची दिशा बदलत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि तपासाला निर्णायक वळण मिळाले. एका मंदिराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ७ डिसेंबर रोजी दुपारी तुषार पवार हा दिलीप मिटकर आणि विजय जाधव यांच्यासोबत जाताना दिसला. ते बांधकाम दिलीपच्या काकाचे होते तेथे असलेल्या घराजवळील दृश्यांमध्ये काही वेळाने दिलीप आणि विजय हे दोघे रंगाच्या पोत्यामध्ये अवजड वस्तू बांधून बाहेर आणताना आढळले. ते पोते खाली पडल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते. याच घटनेमुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. सखोल चौकशीत आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. दिलीप मिटकर याला संशय होता की त्याच्या पत्नीचे तुषारशी अनैतिक संबंध आहेत. या संशयातूनच त्याने विजय जाधवच्या मदतीने तुषारचा खून केल्याचे उघड झाले. खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून वाहन क्रमांक एमएच-०५ बीके ३८४३ द्वारे काकांडी परिसरातील शिवारात टाकण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली. पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी शोध घेतला असता पोत्यात तुषार पवार याचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले होते तसेच त्याची शाळेची बॅगही घटनास्थळी सापडली. यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८१/२०१९ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले आणि सहकारी पोलीस अंमलदार मुसळे यांनी तपास पूर्ण करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयात हा खटला ७७/२०२० प्रमाणे सुरु झाला. या खटल्यात एकूण २५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची साक्ष सादर करून आरोपी व मृतामधील सततचा संपर्क सिद्ध केला. जरी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला साक्षीदार नसला तरी सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या प्रत्येक कडीला मजबूतपणे जोडले. शेवटचा संपर्क, सीसीटीव्ही पुरावे, कॉल रेकॉर्ड, मृतदेहाचा शोध आणि आरोपींचे वर्तन या सर्व बाबींचा परस्पर संबंध न्यायालयासमोर स्पष्ट करण्यात आला. या सर्व पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून न्यायाधीश आर. व्ही. कोकरे यांनी आरोपी दिलीप बळीराम मिटकर (वय २१) आणि विजय भोजू जाधव (वय २०) यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप (आजन्म कारावास) व प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावल्याबद्दल कलम २०१ अंतर्गत सात वर्षांची शिक्षा व १० हजार रुपये दंड, तर खुनाचा कट रचल्याबद्दल कलम १२०(ब) अंतर्गत दोन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखात पोलीस अंमलदार बसलिंग कोळनुरे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम उत्कृष्ट केले. पोलिसांची मेहनत, सरकारी पक्षाची प्रभावी मांडणी आणि न्यायालयाचा न्यायनिष्ठ निर्णय यामुळे परिस्थितीजन्य पुरावे किती प्रभावी ठरू शकतात याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,247 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रस्तासुरक्षा सरप्राईज गिफ्ट्सचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण गुरुद्वारा सचखंड बोर्डातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी