वसमत (प्रतिनिधी)- कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, संबंधित व्यक्तीची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारातील बालाजी खुबखुळे यांच्या शेत गट क्रमांक ११३ मध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३५ वर्षे असून चेहरा गोलाकार व खोपडी फुगलेली आहे. रंग सावळा, केस काळे व लांब असून नखे वाढलेली आहेत. उंची अंदाजे १६५ ते १६७ सेंटीमीटर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ओळख पटविण्यासाठी काही महत्त्वाच्या खुणाही पोलिसांनी जाहीर केल्या आहेत. मृताच्या गळ्यात सिल्व्हर धातूची साखळी (चेन) आढळून आली असून घटनास्थळाजवळ काळ्या रंगाचे रबरी हातातील कडे मिळून आले आहेत. या वस्तूंच्या आधारे मृताची ओळख पटण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मृतदेह बराच काळ उघड्यावर असल्याने त्याची अवस्था गंभीर स्वरूपाची झाली असून ओळख पटविणे कठीण बनले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, नातेवाईक किंवा संबंधित व्यक्तीबाबत माहिती असलेल्या कोणालाही पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख, नाव, गाव किंवा नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती असल्यास तपास अधिकारी महादेव उर्फ माधव पुरी (मो. 8668543100), पोलीस स्टेशन कुरुंदा (मो. 8669900691), स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि जिव्हारे (मो. 8888859970) अथवा पोनि मोहन भोसले (मो. 7038833358) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन कुरुंदा पोलिसांनी केले आहे.
