नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सगरोळी परिसरातील वाळू घाटांवर २१ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक शहाजी कुमार यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २६ वाळू घाटांचा कारभार उघडकीस आणला. या कारवाईदरम्यान चळवळी बस स्थानकाजवळील चार वाहनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घाटांवर उभ्या असलेल्या ३३ हायवा वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
मात्र, या कारवाईनंतर तब्बल ४८ तास उलटूनही महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभाग घटनास्थळी दाखल झाले नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत आज २३ मार्चपर्यंत तरी या दोन्ही विभागांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील कारवाई रखडल्याने संपूर्ण कारभार ठप्प पडला आहे.
गौण खनिज कायद्यानुसार वाळू घाटांवरील नियंत्रण आणि संबंधित कारवाई करण्याचा मुख्य अधिकार महसूल विभागाकडे असतो. तसेच, वाहतूक नियमांच्या अनुषंगाने वाहनांची तपासणी व कारवाई करण्याची जबाबदारी आरटीओ विभागाची असते. अशा परिस्थितीत पोलिसांनी प्राथमिक कारवाई करत गाड्या ताब्यात घेतल्या असल्या, तरी पुढील तपासणी आणि निर्णयासाठी संबंधित विभागांची उपस्थिती अत्यावश्यक आहे.
दरम्यान, पोलिसांकडेही काही प्रमाणात अधिकार असले तरी, त्यांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांची पुढील तपासणी महसूल व आरटीओ विभागानेच करणे अपेक्षित आहे. जर या वाहनांमध्ये गौण खनिज कायदा किंवा परिवहन नियमांनुसार कोणतीही अनियमितता आढळली नाही, तर त्या गाड्या सोडण्याचा अधिकारही याच विभागांकडे आहे. मात्र, संबंधित विभागांच्या अनुपस्थितीमुळे हे प्रकरण सध्या ‘भिजत घोंगडे’ ठरत आहे.
या संपूर्ण घडामोडींचा थेट परिणाम महसूल विभागाच्या उत्पन्नावर होत असल्याचीही चर्चा आहे. वाळू घाटांचा कारभार ठप्प राहिल्याने शासनाला मिळणारा महसूलही थांबला आहे. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
तसेच, पोलिसांनी आरटीओ विभागाला वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती असून, तरीही आरटीओ विभागाने अद्याप कारवाई न केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. परिवहन कायद्यानुसार आवश्यक त्या तपासण्या करून कारवाई करणे ही आरटीओची जबाबदारी असताना विलंब का होत आहे, याबाबत स्पष्टता नाही.
एकीकडे पोलिसांचा कडक पहारा आणि दुसरीकडे संबंधित विभागांची अनुपस्थिती, यामुळे सगरोळीतील वाळू घाटांचा संपूर्ण व्यवहार ठप्प झाला आहे. तब्बल ४८ तासांपासून सुरू असलेली ही स्थिती आणखी किती काळ कायम राहणार, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने समन्वय साधून या प्रकरणावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
संबंधित बातमी ….
सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब!
