नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान होत असल्याचा आरोप करत नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. यावेळी माजी उपमहापौर अब्दुल गफार यांची उपस्थिती होती.
सावंत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सभागृहात लावण्यात आलेली महापुरुषांची प्रतिमा गॅलरीच्या खालील भागात असल्याने त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून पायात बूट-चप्पल घालून वावर होत आहे. त्यामुळे प्रतिमेचा अवमान होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, गॅलरीच्या खालील भिंतीवर लावलेली प्रतिमा पायांच्या खाली येत असल्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित प्रतिमा तात्काळ सुरक्षित व योग्य ठिकाणी हलविण्यात यावी, जेणेकरून महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

