गॅस सिलेंडरच्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)-  गोकुळनगर परिसरात गॅस सिलेंडर व पाण्याच्या टाकीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमस बालाजी यादव (वय ५३, रा. गोकुळनगर, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर येथे ही घटना घडली.
तक्रारीनुसार, तक्रारदार आपल्या नातेवाईकांच्या घरी गॅस सिलेंडरची टाकी घेण्यासाठी गेले असता तेथे आधीपासूनच संतोष चौधरी, प्रकाश जगदीश यादव, आकाश जगदीश यादव आणि प्रणव संतोष चौधरी उपस्थित होते. पाण्याची टाकी बसविण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीत तक्रारदार जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!