दिल्ली (प्रतिनिधी)-देशासाठी अत्यंत दुःखद अशी घटना आज घडली आहे. भारतीय वायुसेनेचे सुखोई लढाऊ विमान आसाममधील जोरहाट परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले असून या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे लढाऊ विमान जोरहाट येथील तळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच रडारवरून गायब झाले. त्यानंतर काही वेळात विमान कोसळल्याची माहिती मिळाली. दुर्घटनाग्रस्त विमानात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गकर हे वैमानिक होते. त्यापैकी फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गकर हे महाराष्ट्रातील सुपुत्र होते. देशाच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या या दोन्ही वैमानिकांच्या निधनाने वायुसेनेसह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही वैमानिक यापूर्वी “ऑपरेशन सिंदूर”सारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि योगदान लक्षणीय मानले जात होते. आजच्या या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने भारतीय वायुसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तेजस लढाऊ विमानाचीही दुर्घटना झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेबाबत आणि तांत्रिक क्षमतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताला एकूण सुमारे ४७ लढाऊ स्क्वॉड्रनची गरज असताना सध्या केवळ सुमारे २९ स्क्वॉड्रनवरच वायुसेना कार्यरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यात काही विमाने तांत्रिक कारणांमुळे ग्राउंड करण्यात आल्याने तुटवडा अधिकच जाणवत आहे. सुखोई ही विमानेही टप्प्याटप्प्याने सेवावृत्तीच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवीन आणि अद्ययावत लढाऊ विमानांची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. अलीकडील काही आंतरराष्ट्रीय दौऱ्यांदरम्यान भारताला अत्याधुनिक लढाऊ विमान मिळणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या, परंतु अद्याप ठोस करार किंवा निर्णय समोर आलेला नाही. आज झालेल्या या दुर्घटनेनंतर आणखी एक गंभीर प्रश्न पुढे येत आहे. विमानात आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकांना बाहेर पडण्यासाठी असलेली इजेक्शन सिस्टीम कार्यरत का झाली नाही, याबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय वायुसेनेने चौकशीचे आदेश दिले असून तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कोणते कारण होते का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. भारतीय वायुसेनेच्या आधुनिकीकरणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. वायुसेनेला अत्याधुनिक तंत्रज्ञान, सक्षम शस्त्रसज्जता आणि पुरेशी विमाने मिळणे ही काळाची गरज असल्याचे अनेक तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत. वायुसेना प्रमुखांनीही यापूर्वी सार्वजनिकरित्या या संदर्भात चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, या दुर्घटनेमुळे महाराष्ट्राने आपला एक शूर सुपुत्र गमावला तर देशाने दोन सुपुत्र गमावले आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणाऱ्या या दोन्ही वैमानिकांना संपूर्ण देशाकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांचे बलिदान राष्ट्र कधीही विसरणार नाही, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 539 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते – श्रीमती चंद्रकला रावळकर इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा औद्योगिक अभ्यास दौरा यशस्वी