गुप्तधनाच्या हव्यासापोटी शेतात खोदकाम; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
नायगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गडगा शिवार परिसरात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी महादेव मंदिर परिसरात पूजा करून गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने शेतामध्ये खोदकाम करत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून एक चारचाकी वाहन, फावडे व इतर साहित्य असा एकूण सुमारे ६ लाख १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पसेश्वर देविदास वांदकर (वय २७), व्यंकट माधवराव इरसे (वय ४८), दिलीप भानुदास डोईफोडे (वय ३२), माधव रामराव सूर्यवंशी (वय २६), विशाल बालाजी शिंदे (वय २२), लक्ष्मीबाई रामराव सूर्यवंशी (वय ५८) व मधुकर जळबा बोर्डेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल बालाजी बबंतराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नायगाव येथे महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा क्रमांक ४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
