जवळ्यात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड – शिवजयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या पाचदिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय शिवजयंती मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, शिवज्ञान चाचणी स्पर्धा, भाषण स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. रंगभरण चित्रकला स्पर्धेतूनही छत्रपती शिवाजी महाराजांना चिमुकल्यांनी अभिवादन केले. यात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, आनंद गोडबोले, मनिषा गच्चे, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, इंदिरा पांचाळ आदींची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पाच दिवस विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा, दुसऱ्या दिवशी रंगभरण चित्रकला स्पर्धा, तिसऱ्या दिवशी शिवज्ञान चाचणी स्पर्धा, चौथ्या दिवशी भाषण स्पर्धा तर पाचव्या दिवशी निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांच्या यशस्वी संयोजनासाठी शालेय शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी तेजल शिखरे, अनन्या टिमके, सोनल गोडबोले, मयुरी गोडबोले, शाहेद शेख, विद्या गोडबोले, विश्वदीप झिंझाडे, प्रेम गोडबोले, सिद्धांत गोडबोले, पीरखाँ पठाण, अजिंक्य गोडबोले, नागेश मठपती यांनी नियोजन केले. बक्षीस वितरण समारंभाच्या प्रारंभी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे व शिक्षकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांची आवर्जून उपस्थिती होती.
