जवळ्यात बालकन्यांचा ‘नवा एल्गार’ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रॅली;  सेव्ह द गर्ल चा गुंजला नारा

नांदेड- भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.  राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींना , महिलांना त्याचे असलेले हक्क, अधिकार याबाबत जागृत करणे होय. इतकेच नव्हे तरआजही समाजात मुलींसोबता होत असलेले भेदभाव नष्ट करत , समाजाकडे मुलगा-मुलगी यांच्याकडे सामान दृष्टीकोनातून बघण्याचा दृष्टीकोन तयार करणे , समाजामध्ये जागृती करणे हा होय. या निमित्ताने जवळा देशमुख येथील मुलींनी गावभर रॅली काढून नवा एल्गार पुकारला! यावेळी जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, मनिषा गच्चे यांची उपस्थिती होती.
          जिल्ह्यात ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत लेक वाचवा लेक शिकवा अभियान सुरू आहे. या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व इयत्तांच्या मुलींनी हातात फलक घेऊन रॅली काढली. लोकांमध्ये  मुलींना आधार आणि संधी प्रदान करण्यासाठी,  मुलींना त्यांच्या हक्कांबद्दल आणि शिक्षणाबद्दल जागरुकता तसेच  आरोग्य आणि पोषण याबद्दल जागरूकता वाढवणारी घोषणाफलक हाती देण्यात आले. याबरोबरच स्त्री भ्रूणहत्या आणि लैंगिक असमानता ते लैंगिक शोषण या सर्व मुद्द्यांवर मुली आणि जनतेला जागरूक करण्यासाठीही शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांनीही उत्साहात प्रतिसाद दिला. गावातील नवसाक्षरांनी घोषणाफलक वाचून माहिती जाणून घेतली. आजच्या अतिसंवेदनशील काळात सर्वत्र सेव्ह द गर्ल चा नारा गुंजला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!