नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नगीना घाट परिसरात ३ जानेवारी रोजी घडलेल्या हाणामारी व गोळीबाराच्या गंभीर घटनेप्रकरणी आज मुख्य न्याय दंडाधिकारी राजेश नागरगोजे यांनी मोठा निर्णय देत पंजाब येथील सात आणि नांदेडमधील तीन अशा एकूण दहा आरोपींना ७ जानेवारी २०२6 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
३ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता नगीना घाट परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादादरम्यान एका गटातील एका युवकाने गोळीबार केला, त्यात नांदेड येथील एक युवक जखमी झाला. या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून त्यानुसार गुन्हा क्रमांक ४ आणि ५/२०२६ दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकमेकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तपासाअंतर्गत ५ जानेवारी रोजी गुन्हा क्रमांक ४ मध्ये अर्षदिपसिंघ मनजीत कुमार (वय २४), लावप्रीतसिंघ बलविंदरसिंघ चहल (२२) गुरुलाल सिंग सरदार बगीचा सिंग (वय ३०), हरपाल सिंग, मोहर सिंग (वय २८), बलजिंदर सिंग बक्षीसिंग भुल्लर (वय ३४), पिशोरसिंघ अवतारसिंघ (वय ४२), दलबीरसिंघ जरमलसिंग (वय २७) अशा पंजाबमधील सात आरोपींना अटक करण्यात आली. तसेच गुन्हा क्रमांक ५ मध्ये नांदेड येथील गुरप्रीत सिंग निर्भय सिंग संधू (३७) मनज्योतसिंघ हरिंदरसिंघ सेठी (वय २७) आणि मनमोहन सिंग उर्फ कुणाल राजेंद्र सिंग नंबरदार (वय ३४) अशा तीन आरोपींना अटक करण्यात आली.
या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी न्यायालयात मांडले. यावर सुनावणी घेत मुख्य न्याय दंडाधिकारी राजेश नागरगोजे यांनी सर्व दहा आरोपींना ७ जानेवारी २०२६ पर्यंत, म्हणजे दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, नगीना घाट परिसरातील तणावपूर्ण वातावरणावर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
संबंधित बातमी ..
कालचे गोळीबार प्रकरण; जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल
