नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलाने प्रभावी तपास आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विविध ठिकाणी हरवलेले तब्बल २०२ महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन शोधून काढले असून, त्यांची एकूण किंमत ३० लाख ४९ हजार रुपये आहे. गर्दीची ठिकाणे, आठवडी बाजार, सार्वजनिक परिसरातून हे मोबाईल हरवले होते.
यातील काही मोबाईल १५ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित मोबाईल मालकांना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते परत करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि गृह पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप उपस्थित होते.
ही उल्लेखनीय कामगिरी सायबर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार दीपक ओढणे, महेश बडगु, कांचन कसबे, शुभांगी जाधव, दाविद पिडगे, काशिनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्वर यन्नावार, दीपक राठोड आणि साई शेंडगे यांनी विशेष योगदान दिले.

नांदेड पोलिसांनी या सर्व मोबाईलचे IMEI क्रमांक ‘Nanded Police’ या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केले आहेत. ज्या नागरिकांचे मोबाईल अद्याप सापडले नसतील, त्यांनी या फेसबुक पेजवर आपला मोबाईल सापडला आहे का, याची खात्री करून पोलीस अधीक्षक कार्यालयातून मोबाईल स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मोबाईल हरविल्यास तात्काळ CEIR पोर्टलवर मोबाईलची माहिती अपलोड करावी, जेणेकरून गहाळ झालेले मोबाईल लवकरात लवकर शोधणे शक्य होईल.
