ईस्लापूर (प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात इस्लापूर पोलिसांनी रविवारी सकाळी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 16 किलो गांजा जप्त केला असून एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई राबवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
शिवणी झळकवाडी दरम्यानच्या माळरानात तूर पिकाच्या शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी अंदाजे 11 वाजता पथकाने घटनास्थळी धडक देत छापा टाकला. या छाप्यात ओली व सुकी अशी एकूण 16 किलो 50 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे बाजार किंमत 1 लाख 60 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.ही कारवाई नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, हिमायतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल भगत यांच्या पर्यवेक्षणाखाली तर इस्लापूर पोलिस ठाण्याचे सपोनि उमेश भोसले यांच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान मोबाईल फॉरेन्सिक टीम देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. ठिकाणाचा पंचनामा करून सर्व पुरावे नीट सील पॅकमध्ये जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाची झाडे जप्त केल्यानंतर या प्रकरणातील एका संशयित आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.या कारवाईमुळे परिसरातील तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक कोमल कागणे, ओ.ओ. एल. डीडेवार, एस.ए. साखरे, तसेच होमगार्ड अगलावे, राजारपोलू, मागीरवाड यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांची मोठी फौजफाटा तैनात असल्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ही कारवाई सुरू असताना व बातमी लिहेपर्यंत सपोनि उमेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू होती.
इस्लापूर पोलिसांनी केला 16 किलो गांजा जप्त
