नांदेड – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना 26 नोव्हेंबर 2025 व ऊद्योग, ऊर्जा, कामगार व खनिजकर्म विभाग शासन परिपत्रक 28 नोव्हेंबर 2025 नुसार ही सुट्टी जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा व कुंडलवाडी या नगरपरिषद / नगरपंचायत येथील मतदारसंघात ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.
मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी मतदारसंघातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. (जसे राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानक्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांना मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्य विरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अहवान सहायक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांनी केले आहे.
