२६ नोव्हेंबर रोजी अयोध्येत मंदिरावर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. दृश्य मोहक होते, परंतु त्यासंदर्भात अनेक संत-परिषदांमध्ये मतभेद दिसून आले. काही संतांनी तर स्पष्ट शब्दांत सांगितले की “मंदिरावर अशा प्रकारचे ध्वजारोहण आमच्या परंपरेतच नाही,” तर काहींचे म्हणणे होते की हा कार्यक्रम धार्मिक विधीपेक्षा राजकीय उत्सवाचे रूप धारण करून बसला आहे.काही विद्वान संतांनी हेही प्रश्न उपस्थित केले की, “मंदिराच्या कळसाची स्थापना अद्याप विधिवत पूर्ण झालेली नाही, तर ध्वज-स्थापनेला इतके महत्त्व का?” तरीसुद्धा मोदीजींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झाला.
या समारंभात अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद जे अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करतात त्यांना आमंत्रणही देण्यात आले नाही. पंतप्रधानांचे वय आता ७५ वर्षांहून अधिक झाले आहे; त्यामुळे ध्वजारोहण करताना त्यांच्या हातात क्षणभर दिसलेला थरथराटसुद्धा गोडी मीडियाने भावनात्मक दृश्य म्हणून रंगवला.यानंतरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “सत्तेत आल्यापासून आम्ही रामराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहोत, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालत आहोत.”
परंतु आश्चर्य म्हणजे, त्याच कार्यक्रमात अयोध्येचे दलित खासदारच नव्हते, मात्र अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारखे नामवंत सेलिब्रिटी हजेरी लावत होते. सरसंघचालक मोहन भागवत देखील कार्यक्रमात उपस्थित होते, आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की पंतप्रधानांनी हजेरी लावण्यास सांगितले की आरएसएस नेत्यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे अशी परंपराच जणू निर्माण झाली आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणाने संघाचे अस्तित्वही काही प्रमाणात संकुचित झाल्याचे जाणवते. आणि या पार्श्वभूमीवर मोदीजी म्हणतात की पूर्वीची सरकारे दलित, अनुसूचित जाती व अल्पसंख्याकांना न्याय देत नव्हती.कार्यक्रमाचे थेट प्रसारण अनेक वृत्तवाहिन्यांवर झाले; अँकर ज्या पद्धतीने वर्णन करत होते, ते पाहता असे वाटत होते की टेलिव्हिजनमधूनच अश्रू बाहेर पडतील!

एकीकडे हा भव्य इव्हेंट झगमगत होता, तर दुसरीकडे खऱ्या अर्थाने जनसेवा जगत होती. आजचे नेते स्वतःला जनता-सेवक म्हणवून घेतात, परंतु सत्तेच्या शिखरावर जाऊन सामंतशाहीचे रूप धारण करतात ही वस्तुस्थिती लपवून ठेवण्यासारखी नाही.मोदीजींनी त्या दिवशी ‘अल्पसंख्याकांच्या आणि दलितांच्या विकासा’चे दावे केले, परंतु त्यांच्या विधानांशी प्रत्यक्ष वास्तव फारकत घेतेय असे भासते. नेमक्याच त्या दिवशी भारतीय संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी एका दलित कुटुंबातील मुलीच्या कर्करोग उपचारांची पाहणी करत होते.

या घटनेचा उगम २ ऑक्टोबर रोजीच्या त्या भयावह घटनेत आहे. जिथे उत्तर प्रदेशातील एका दलित युवकाला अमानुष मारहाण करण्यात आली. तो जीवाच्या आकांताने “राहुल गांधी” म्हणत होता, तर मारणारे म्हणत होते, “हम बाबा के लोग हैं.”ड्रोन चोरीचा आरोप लावून त्याला मारहाण केली, व्हिडिओ व्हायरल झाला, आणि शेवटी त्याला नाल्याजवळ फेकून दिले. पोलिसांसमोरच ही क्रूरता घडली. काही अधिकाऱ्यांना निलंबित केले गेले, मात्र त्या कुटुंबावर कायमचा अंधार उतरला.
राहुल गांधी, रायबरेलीचे खासदार म्हणून, त्या कुटुंबाला भेटायला गेले. भेटीनंतर स्थानिक प्रशासनाने त्या कुटुंबावर दबाव आणल्याचीही चर्चा आहे, परंतु तो परिवार राहुल गांधींसोबत ठामपणे उभा राहिला.
त्यांच्या घरातील तरुणी ‘सुमन’ कर्करोगाशी झुंज देत होती. राहुल गांधींनी तिच्या उपचारांची जबाबदारी स्वतः घेतली . कोणतीही जाहिरात नाही, कोणताही प्रसिद्धीचा गवगवा नाही.त्या दिवशी ज्या क्षणी अयोध्येत लाल-पीत झगमगाट होत होता त्याच वेळी राहुल गांधीची माणसे त्या दलित मुलीला रुग्णालयात भेट देत होते. ही बातमी सोशल मीडियावर काही स्थानिकांच्या पोस्टमुळेच समोर आली.
एकाच दिवसातील दोन घटना किती गडद विरोधाभास दाखवतात!
एक नेता इव्हेंटच्या चमकदार प्रकाशात रमलेला, तर दुसरा गरीबांच्या अंधारात दिवा पेटवणारा.मुलगी सुमन म्हणते, “मी बरी झाले तर मला मला वाचवणाऱ्या त्या व्यक्तीला राहुल गांधींना भेटायचे आहे.”हे शब्द केवळ आभार नाहीत; ते आपल्या समाजातील मूल्यांची जाणीव करून देणारे आहेत.माणूस म्हणून दलित, वंचित, शेतकरी, आदिवासी यांच्याप्रती जबाबदारी केवळ भाषणांतून निभावत नाही; शब्द तेव्हा अर्थपूर्ण ठरतात, जेव्हा ते कृतीत उतरतात.
२०१४ पासून अनेक बदल झाले रुपयाची किंमत घसरली, सोन्याचे दर वाढले, महागाई सर्वसामान्यांना चिरडत चालली. उत्तर प्रदेशमध्ये दलित व महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक आहे; हे अधिकृत नोंदी सांगतात.आजही दलित तरुणाला स्वतःच्या लग्नाची वरात काढण्यासाठी पोलीस संरक्षण घ्यावे लागते हाच का रामराज्य?
भगवा ध्वज फडकवून राज्य सुस्थितीत येत नाही; सुशासनाने रामराज्य येत. ध्वजारोहणाने नाही.आज तरी समाजाने विचार करायला हवा दिखाव्याच्या सोहळ्यांपेक्षा माणुसकीचा दीप कुठे उजळतो आहे?
