नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेमध्ये चोरट्याला चोरी करायला लावून त्याला सहकार्य करणाचा आरोप असणाऱ्या पोलीसाची जामीन प्राथमिक न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता या पोलीसाने जिल्हा न्यायालयाकडे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक न्यायालयाने या पोलीसाची जामीन रद्द केली तेंव्हा तो पोलीस मुख्यालयात सलग्न होता.
दि.7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-नागपुर या रेल्वे गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या गणेश राठी यांच्या पत्नीची बॅग चोरीला गेली. ही बॅग पुर्णा रेल्वे स्थानकात चोरीला गेली होती. त्यात 14 लाख 100 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणात पोलीसांनी बाळू गणपत गव्हाणेला रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. रेल्वे पोलीस स्थानक नांदेड येथे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलीसांनी बाळू गव्हाणेकडून 7 लाख 52 हजार 984 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांच्या तपासात असे दिसले की, नांदेड रेल्वे पोलीस स्थानकात नियुक्तीस असलेला पोलीस अक्षय मोरचुले बकल नंबर 441 हा चोरी झालेल्या दिवशी बाळू गव्हाणेसोबत पुर्णा रेल्वे स्थानकात फिरत असतांना दिसला. खरे तर त्या दिवशी तो नागपूर येथील धम्म परिषदेच्या बंदोबस्त हजर असणे आवश्यक होते. सोबतच तो रेल्वे स्थानक पुर्णा येथे पोलीस गणवेशात होता. त्यानेच वातानुकुलीत कक्षाचे दार उघडल्यानंतर चोर बाळू गव्हाणे हा आत गेला होता. ही सर्व माहिती सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आली. त्यामुळे नांदेड रेल्वे पोलीसांनी पोलीस अक्षय मोरचुलेला अटक केली.
पण न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी न देता जामीन दिला. यावर तपासीक अंमलदाराने पुर्नविलोकनाचा अर्ज सादर केला. त्यात अक्षय मोरचुलेची जामीन रद्द झाली. आता काल दि.25 नोव्हेंबर रोजी अक्षय मोरचुलेने नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज सादर केला आहे. प्राप्त माहितीनुसार आज न्यायालयाने त्या प्रकरणात नांदेड रेल्वे पोलीसांना नोटीस काढली आहे. या प्रकरणात जवळपास 6 लाख 50 हजारांचा चोरीला गेलेला ऐवज जप्त करणे शिल्लक आहे. आता जिल्हा न्यायालय चोरीचा आरोप असलेल्या पोलीसाला अटकपुर्व जामीन देते की, नाही हे पुढच्या तारखेला कळेल.
संबंधीत बातमी….
चोरीच्या गुन्ह्यातीली आरोपी पोलीस लोहमार्ग पोलीसांना सापडेना
