परभणी(प्रतिनिधी)- जनतेच्या मनातील तक्रारींना उत्तर देत न्यायाचा किरण पोहोचविण्यासाठी पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी ‘जनता संवाद व तक्रार निवारण दिन’ आयोजित केला. या दिवशी नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमधील एकूण 1168 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या उपक्रमात सर्वाधिक तक्रारींचे निराकरण करत लातूर जिल्ह्याने अग्रस्थान पटकावले.
हा अभिनव उपक्रम पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या कल्पनेतून साकारला गेला असून, जनता संवाद व तक्रार निवारण दिन दर शनिवारी पोलीस ठाणे स्तरावर नियमितपणे आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकारीही या उपक्रमाला थेट उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकतील आणि त्यावर तातडीने निर्णय देतील.
जिल्हानिहाय तक्रारींचा निपटारा (11 ऑक्टोबर)
लातूर — 600 तक्रारींचा निकाल (पोलिस अधीक्षक 10, उपविभागीय अधिकारी 61, ठाणे प्रभारी 559)
नांदेड — 285 तक्रारींचा निकाल (पोलिस अधीक्षक 20, अपर पोलिस अधीक्षक 35, उपविभागीय अधिकारी 70, ठाणे प्रभारी 160)
परभणी — 259 तक्रारींचा निकाल (पोलिस अधीक्षक 10, अपर पोलिस अधीक्षक 15, उपविभागीय अधिकारी 109, ठाणे प्रभारी 125)
हिंगोली — 24 तक्रारींचा निकाल (पोलिस अधीक्षक 5, अपर पोलिस अधीक्षक 4, उपविभागीय अधिकारी 1, ठाणे प्रभारी 14)
या उपक्रमाची यशस्वी पहिली फेरी 11 ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यात याच चार जिल्ह्यांमध्ये अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यावेळी पोलिस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक यांसह वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
“तक्रारी दारात नाही… तर निर्णय आपल्या हातात” — या ब्रीदवाक्याखाली राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाद्वारे नागरिकांना वेळेत न्याय देण्याचे उद्दिष्ट पोलिस विभागाने ठेवले आहे.प्रत्येक शनिवारी सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम सर्व पोलीस ठाण्यांमध्ये होणार असून, नागरिकांना आपली तक्रार मांडण्याचे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिस आणि जनतेतील संवादाचे सेतू अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक “विश्वासाचा नवा अध्याय” ठरत आहे.
