प्रत्‍येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावा – जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड  : –पीक कापणी प्रयोगाच्‍या नियोजनाप्रमाणे प्रत्‍येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी, महसूल व ग्राम विकास (जिल्‍हा परिषद) विभागाच्‍या अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्‍यात आली. खरीप हंगाम सन २०२५-२६ साठी सर्व संबंधीतांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्‍यात आले आहे.

 

यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगांना आधारभूत धरण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे पीक कापणी प्रयोगात कोणत्‍याही प्रकारची चूक होणार नाही. पीक कापणी प्‍लॉटची आखणी, कापूस पिकांबाबत आवश्‍यक वेचनी, भात, सोयाबीन, ज्‍वार, तूर इत्‍यादींबाबत सुकविण्‍याचे प्रयोग,उत्‍पादन मोजणी तंत्र तसेच प्रयोगाची आवश्‍यक छायाचित्रे, नोंदी संकलित कराव्‍यात. सर्व प्रयोग शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसारच पार पडतील याबाबत सर्व संबंधीतांनी दक्षता घेण्‍याच्‍या सूचना यावेळी देण्‍यात आल्‍या. पीक विम्‍यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्‍यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्‍यन्‍य साधारण महत्‍व असल्‍याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेल्‍या गावातील सर्व प्रयोग सीसीई ॲपवर अचूकपणे पार नोंदवले जातील यासाठी आवश्‍यक दक्षता घेण्‍याबाबत त्‍यांनी सूचना दिल्‍या.

 

जिल्‍हयात सर्वत्र अतिवृष्‍टी झाल्‍यामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्‍याने सोयाबीन, कापूस, ज्‍वार , तूर पिकांचे कापणी प्रयोग शिल्‍लक आहेत.जिल्‍हयाभरात ५५८ गावांत एकूण ३३१२ कापणी प्रयोगांचे नियोजन करण्‍यात आले आहे. ग्रामस्‍तरीय समिती, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्‍यात आली आहे.त्‍याच गावातील प्रगतीशील शेतकरी, पोलिस पाटील व ग्रामपंचायत निर्देशीत सदस्‍य यांनी देखील अचूक निष्‍कर्ष नोंदवले जातील यासाठी नियोजीत कापणी प्रयोगास वेळेवर उपस्थित राहण्‍याचे आवाहन केले.

याबैठकीस जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्‍तप्रसाद कळसाईत, निवासी उपजिल्‍हाधिकारी किरण अंबेकर,तहसिलदार विपीन पाटील, तंत्र अधिकारी गोविंद देशमूख, सुप्रिया वायवळ यांचेसह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!