नांदेड : नांदेड जिल्हा सह मराठवाड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे . या शेतीतून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना काहीही उत्पादन मिळणार नाही हे निश्चित झाले असून हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय आयुक्तालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली . किसान सभेचे शेतकरी नेते डॉक्टर कॉम्रेड अजित नवले यांनी ही माहिती आज पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला किसान सभा शेतकरी नेते डॉ.कॉ.अजित नवले यांच्यासह जनवादी चळवळीचे नेते कॉ. विजय गाभणे , किसान सभा तथा शेतकरी नेते कॉ.शंकर सिडाम , किसान सभा तथा शेतकरी नेते , कॉ. अर्जुन आडे , कॉ.किशोर पवार , CITU राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार , कॉ. गंगाधर गायकवाड CITU जिल्हा सेक्रेटरी , कॉ. लता गायकवाड कॉ.करवंदा गायकवाड कॉ.जय गायकवाड कॉ.प्रफुल कौडकर आदींची यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून शेतकरी कामगार कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वासही डॉक्टर नवले यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य सरकार जाती आणि धर्माचे राजकारण पुढे करून शेतकऱ्यांच्या पूर परिस्थितीला बगल देण्याचे कटकारस्थान रचत आहे. राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना राज्यामध्ये आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असे बॅनर्स लावून धर्मा धर्मात आणि जाती जातीत निर्माण करत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचेही डॉक्टर नवले यांनी यावेळी सांगितले . नांदेड शहरालगत असलेल्या वाणेगाव येथील वामन सोनटक्के या शेतकऱ्याने उध्वस्त झालेल्या शेतीमुळे आत्महत्या केली परंतु या शेतकऱ्याच्या कुटुंबांची भेट घेण्याची साधी तसदी, नांदेडच्या मोठ्या नेतृत्वाने अथवा कोणत्याही राजकारणाने केली नाही , एवढेच नाही तर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ही सोनटक्के कुटुंबांची भेट घेतली नाही . याचा अर्थ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रति राज्य सरकार आणि अधिकारी उदासीन आहे , असा गंभीर आरोप हे डॉक्टर नवले यांनी यावेळी केला . शेती उध्वस्त झाल्याने शेतीवर आधारित असलेले संपूर्ण उद्योग उध्वस्त होणार आहेत . शेतीवर आधारित असलेले कष्टकरी उध्वस्त होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये मदत द्यावी तर याचवेळी रोजगार बुडाल्यामुळे उध्वस्त होणाऱ्या कष्टकऱ्यांना सावरण्यासाठी प्रति महिना 25000 रुपयांचे अर्थसहाय्य तातडीने करावे यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही डॉ. नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक सिटूच्या राज्यसचिव कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी केले . यावेळी कॉ. विजय गाभने आणि कॉ. गंगाधर गायकवाड यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.
