कागदपत्रांची योग्य तयारी नसल्याने निकिता शहापुरवाड यांना जामीन मंजुर
नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना उध्दव ठाकरे गटातील कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रार, पोलीस कोठडीची कारणे आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता अयोग्य झाल्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. निंबाळकर यांनी निकिता शहापुरवाडला पोलीस कोठडी नाकारली आहे. सोबतच 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सिध्देश्र्वर अनकाडे यांच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 352 (2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 898/2025 दाखल झाला. या गुन्ह्यात व्यंकट शहापुरवाड आणि व्यंकट गोविंद शहापुरवाड या दोघांची नावे आरोपी या सदरात आहेत. हा गुन्हा 19 सप्टेंबर रोजी दाखल झाला. या गुन्ह्यातील व्यंकट गोविंद शहापुरवाड यांची प्रकृती खराब असल्याने ते उपचार घेत असल्याची माहिती न्यायालयात समोर आली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता निकिता व्यंकट शहापुरवाड (39) यांना अटक केली. या प्रकरणात तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.सोबतच दुसरा एक गुन्हा या दोघांविरुध्द दाखल आहे. त्याचा क्रमांक 909/2025 असा आहे.
अटक झाल्यानंतर आज सहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा काळे, पोलीस अंमलदार भाग्यश्री सुर्यवंशी, उज्वला सदावर्ते, नागनाथ स्वामी आणि रवि संकुरवार यांनी निकिता शहापुरवाडला न्यायालयासमक्ष हजर केले. या प्रकरणात त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोनचा डाटा उपलब्ध करायचा आहे, पोलीसांकडे असलेले क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, चेक, कोणाचे आहेत हे तपासायचे आहेत आणि त्यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती रेखा काळे आणि सरकारी वकीलांनी केली. निकिता शहापुरवाड यांच्यावतीने ऍड. आय.सी.जोंधळे यांनी बाजू मांडतांना सांगितले की, या गुन्ह्यातील फिर्याद, लावलेले भारतीय न्याय संहितेतील कलम याची कोठेच जोड बसत नाही. दिलेल्या फिर्यादीप्रमाणे व्यवहार झालेला दिसतो. त्यात फसवणूक नाही. व्यवहारात चेक वटला नाही त्यासाठी परक्राम्य अभिलेख कायद्यानुसार कार्यवाही व्हायला हवी होती. सोबतच ऍड. आय.सी. जोंधळे यांनी सांगितले की, व्यंकट शहापुरवाड यांना सुध्दा पोलीसांनी पोलीस ठाण्यात नेले होते. परंतू त्यांची प्रकृती बिघडली म्हणून त्यांना दवाखान्यात सुध्दा पोलीसांनीच पाठविले. व्यवहार व्यंकट शहापुरवाड सोबत झालेला आहे. मग त्यांची पत्नी असलेल्या निकिताची पोलीस कोठडी कशाला हवी. सोबतच निकिता शहापुरवाड यांच्या कन्या विद्या यांनी एक अर्ज न्यायालयासमोर दिला. त्या अर्जात 21 सप्टेंबरला माझ्या घरी रेखा काळे आणि साध्या कपड्यातील पोलीस आले त्यांच्या आमच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हीआरपण नेले आहे. सोबतच माझे तीन मोबाईल, पायातील चॉंदीच्या वाळ्या, माझे काही कार्ड, माझी कागदपत्रेपण नेली आहेत. या प्रसंगी न्यायालयातच निकिता शहापुरवाड यांच्या अटकेची माहिती त्यांच्या कन्या विद्या यांना दिल्याची स्वाक्षरी घेत असल्याचे ऍड. आय.सी. जोंधळे यांनी सांगितले.
एकूण झालेल्या युक्तीवादावरून न्यायाधीश निंबाळकर यांनी निकिता शहापुरवाडला गुन्हा क्रमांक 898 मध्ये पोलीस कोठडी नाकारली आणि 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन सुध्दा दिला. सोबत तपासिक अंमलदार रेखा काळे यांना न्यायालयाने समज सुद्धा दिली आहे..पुढे गुन्हा क्रमांक 909 मध्ये सरेंडर बेल मागितली. ही बेल सुध्दा 25 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने मंजुर केली.
