पोलीसांना खरचटले तरी जिवघेणा हल्ला 42 टाके लागतात त्याचा हल्ला जिवघेणा नसतो
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसाला मार लागला तो जिवघेणा हल्ला आणि त्या हल्यातील विरोधी पक्षाला लागलेला मार ही फक्त जखम. अशा पध्दतीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन परस्पर विरोधी गुन्हे सुध्दा आता तपासासाठी सुध्दा दुसरीकडे वर्ग करण्याचे आदेश नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहेत. या दोन गुन्ह्यांमध्ये सुध्दा पोलीस खाते करील ते होईल हेच वाक्य खरे ठरेल काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दि.14 सप्टेंबर रोजी विष्णुपूरी भागात वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांचे बंधू उध्दव सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटूंबावर काही जणांनी हल्ला केला त्यांची नावे त्या एफआयआरमध्ये नमुद आहेत. या एफआयआरमध्ये उध्दव सातपुते यांच्या शब्दांप्रमाणे त्यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. परंतू त्यांनी तो वार चुकवला आणि केशवच्या जबड्यावर तलवारीने मार लागला असे लिहिलेले आहे. तसेच बालाजी आणि केशव यांना सुध्दा जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात ते गंभीर जखमी आहेत असे लिहिलेले आहे. या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 891/2025 दाखल करण्यात आला. ज्यामध्ये सर्वात मोठा आरोप जिवघेणा हल्याचा आहे.
सुरूवातीला पोलीस आणि त्यांच्या कुटूंबियांवरच हल्ला झाला अशीच बातमी समजली. काही तासांनंतर हे समोर आले की, पोलीस आणि त्यांच्या कुटूंबियांनी सुध्दा काही जणांना बरीच मारहाण केलेली आहे. त्यातील जखमी रणदिपसिंघ अग्नीहोत्री यांनी दिलेल्या तक्रारीनंतर घटनेच्या पाचव्या दिवशी गुन्हा क्रमांक 893/2025 दाखल झाला. यामध्ये गंभीर दुखापत हा सर्वात मोठा आरोप आहे. एफआयआर लिहितांना पोलीसंानी एका जागी बंदुक हा शब्द गाळला आहे. तसेच जिवघेणा हल्ला हे दोन शब्द तक्रारीत येवू दिले नाहीत. कारण जखमी तर दवाखान्यात होता. परंतू त्याला 42 टाके लागले आहेत. त्याचे तीन दात तुटले आहेत. या गुन्ह्यामध्ये हत्यार कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आली नाहीत.
एकंदरीत या प्रकरणामध्ये दोन्ही गटांकडे चुक आहे हे सिध्द आहे. बालाजी सातपुतेने आपण पोलीस असल्याचा धाक वापरल्याचा दिसतो. तसेच जखमी रणदिपच्या वडीलांनी जेंव्हा त्याला जखमी अवस्थेत पाहिले तेंव्हा त्यांचाही ताबा सुटला आणि त्यांनी सातपुते कुटूंबियांवर हल्ला केला. पण 42 टाके लागलेल्या माणसावर जिवघेणा हल्ला नाही हे जरा अजब वाटते.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी गुन्हा क्रमांक 891/2025 तपासासाठी आता इतवारा उपविभागाचे पोलीस अधिक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे दिला आहे. तसेच गुन्हा क्रमांक 893/2025 तपासासाठी इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांच्याकडे दिला आहे. यावरुन असे म्हणता येईल की, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांचा नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर किंवा त्या पोलीस ठाण्यातील इतर अधिकाऱ्यांवर विश्र्वास नाही काय? वास्तव न्युज लाईव्ह अनेकदा आपल्या बातम्यांमध्ये “पोलीस खाते करील तेच होईल’ अशा जुन्या वाक्याचा वापर करत असते. तसेच काही या प्रकरणात पण घडणार आहे काय?
पोलीस अधिक्षकांचा नांदेड ग्रामीण पोलीसांवर विश्र्वास नाही का?
