नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातून अनेक बेकायदेशीर वाहनाद्वारे बिदर हिंगोली अवैध प्रवासी वाहतूक होत आहे.मुदत संपलेल्या, नादुरुस्त व जीर्ण वाहनाद्वारे अनेक चालक मध्य धुंद अथवा इतर मादक पदार्थांचे सेवन करून बेदरकारपणे वाहन चालवतात. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक थांबवून बेकायदा वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी हजुरी पाठी संघटनेच्यावतीने नांदेड, बिदर, हिंगोली प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस अधिक्षक यांना केली आहे.
शीख धर्मियांचे दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या व श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या नांदेड भूमीमध्ये सचखंड गुरुद्वारा आहे. सिख धर्मियांच्या पाच तख्तांपैकी एक तख्त असलेले या गुरुद्वाराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात. येथे आलेल्या भाविकांना कर्नाटक राज्य स्थित बिदर येथील नानकझिरा व हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव सह स्थानिक गुरुद्वारांचे दर्शनासाठी शासकीय बसेसची पुरेशा प्रमाणात व्यवस्था नाही. त्यामुळे वेळेअभावी भाविकांना खाजगी बसेस, टेम्पो ट्रॅव्हलर, छोटा हत्ती व इतर वाहनांचा वापर करावा लागतो.

सचखंड गुरुद्वारा व परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी वाहने उपलब्ध आहेत. परंतु भाविकांची संख्या व मिळणारा मोबदल्याच्या मोहापोटी अनेक मुदत संपलेली, नादुरुस्त व जीर्ण वाहने विना विमा संरक्षण, पियूसी व फिटनेस शिवाय चालवली जात आहेत. त्याचप्रमाणे अशा वाहनांचे चालक-मालक अनेक प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करीत बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. तरीही अशा प्रकारची अवैध प्रवासी वाहतूक बंद करून कडक कारवाई करीत वाहने जप्त करण्याची मागणी हजूरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजीतसिंघ बिशनसिंघ हजूरी पाठी, प्रदीपसिंघ जितसिंघ रागी व जगदीपसिंघ नंबरदार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड – हिंगोली, बिदर व पोलीस अधिक्षकांना केली आहे.

