कांचन यादव, प्रियंका भारती आणि सारिका पासवान, या तिघीही महिला राष्ट्रीय जनता दल (राजद) या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्याविषयी त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्विट्स केल्याचे पाहून ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांना या घटनेचा “एक्स-रे” करावासा वाटला. जेव्हा त्यांनी या प्रकरणाची खोलवर पाहणी केली, तेव्हा त्यांना दिसलेला घटनाक्रम अत्यंत विचार करायला लावणारा आहे.अशोक वानखेडे यांच्या मते, या तीन महिला प्रवक्त्या त्या युवती गोदी मीडिया आणि पामेरियन मीडियाच्या चर्चांमध्ये इतक्या प्रभावी ठरल्या की, भारतीय जनता पार्टीच्या काही प्रवक्त्यांनी सरळ अट घातली:”या तिघींपैकी एकालाही चर्चेच्या पॅनलवर सहभागी करू नये, अन्यथा आम्ही कार्यक्रमात सहभागी होणार नाही.”

या आरोपाची पुष्टी करत युवती पैकी एकीने सांगितले की, भाजपच्या प्रवक्त्यांच्या दबावामुळे अनेक वाहिन्यांवरील अँकर आणि प्रोडक्शन टीम यांना या तिघींना चर्चांमध्ये सहभागी करू नका, अशी सूचना देण्यात आली आहे.प्रियंका भारती म्हणतात,”मागील एक वर्षापासून माझ्याशी अनेक चॅनेल्स असेच वागत आहेत. ते सांगतात की विषय बदलला आहे, त्यामुळे तुम्हाला बोलवले जात नाही. पण प्रत्यक्षात विषय तोच असतो. आम्हाला बोलावले जात नाही कारण काही जणांना आमच्यासोबत बसण्यास हरकत आहे. ही एक ‘मॉडर्न अंटचेबिलिटी’ आहे.”त्या पुढे म्हणतात:”मी, सारिका पासवान आणि कांचन यादव, आम्ही बहुजन महिला आहोत. आमच्या उपस्थितीमुळे संपूर्ण इकोसिस्टीम हादरते. तेजस्वी यादव यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळाले आहे. आम्ही न तोडणारच, सोडणार पण नाही, लढा देत राहू.”

कांचन यादव यांनी देखील ट्विट करत म्हटले आहे:”आम्ही टीव्हीवर भाजप प्रवक्त्यांकडून इतरांवर शिवीगाळ केली जाते, हे ऐकतो. लोकसभेत, राज्यसभेत भाजपचे खासदार अतिशय गलिच्छ भाषेत बोलतात, पण त्यांच्यावर कोणतीही बंदी घातली जात नाही. मग बंदी लावणारे कोण?”त्यांनी पुढे स्पष्ट केले की तेजस्वी यादव यांनी ज्या पद्धतीने महिला सशक्तीकरणाचे उदाहरण सादर केले आहे, त्यामुळे आम्ही न घाबरणार, न वाकणार.”राजद कधीच पळपुटेपणा करत नाही. दलित, अतिदलित आणि मागास समाजाचा आवाज जर कोणी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मीडियावर पोहोचवला असेल, तर तो पक्ष आहे, राजद. आणि त्याचे नेतृत्व करत आहेत,तेजस्वी यादव.”
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना राजदचे खासदार मनोज झा यांनी कांचन यादव आणि प्रियंका भारती यांच्या ट्विट्सवर रीट्विट करत लिहिले:”आजच्या टीव्ही चर्चासत्रांची परिस्थिती अत्यंत दु:खद आहे. शिकलेली, सुसंस्कृत, वैचारिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या आमच्या महिला प्रवक्त्यांना भाजप चर्चांमध्ये सहभागी होऊ देत नाही. चॅनेल्स त्यांच्या तालावर नाचत आहेत. विरोधी पक्षाचे प्रतिनिधी कोण असावेत, हे जर सत्ताधारी पक्ष ठरवत असेल, तर ती लोकशाही राहात नाही. ती एक रंगमंचावरची ‘स्क्रिप्टेड’ नौटंकी होते.”त्यांनी पुढे म्हटले की,”लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपले प्रतिनिधी स्वतः निवडण्याचा अधिकार असतो. टीव्ही अँकर्स जर भाजप प्रवक्त्याच्या बाजूने बोलत असतील, त्यांची बाजू सावरण्याचं काम करत असतील, तर मग अँकर खरंच अँकर असतो का?”
माध्यमांतील एकतर्फी चर्चांची स्थिती
जर वाचकांनी मागील वर्षभरातील चर्चासत्रे पाहिली असतील, तर दिसून येते की या तीन युवती नेहमीच अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि तत्पर उत्तरं देतात. जेव्हा अँकर किंवा सत्ता पक्षाचे प्रवक्ते उग्र भाषेत बोलतात, तेव्हा ह्या महिला त्याच भाषेत पण मुद्देसूद उत्तरं देतात.सामान्यतः एका चर्चासत्रात BJP प्रवक्त्याशिवाय संघ विचारक, RSSचे प्रतिनिधी, आणि निवडक विरोधी नेता असतो. अँकर बहुधा सत्ता पक्षाच्या बाजूने झुकलेला असतो. अशा चर्चासत्रांमध्ये हे तीन विरुद्ध एक किंवा चार विरुद्ध एक असं प्रमाण असतं.अनेक वेळा अँकर्स मुद्दा मोडून काढतात, इतरांना बोलू देत नाहीत, किंवा माईक बंद करतात. काही महिला अँकर्सने, आपल्या वयाच्या दुप्पट अनुभव असलेल्या पत्रकारांनाही, “गप्प बसा, तुम्हाला काय कळतं?” असे उद्वेगाने सुनावले आहे.टीव्ही डिबेटमधून सत्य बाहेर येण्याऐवजी, एक बाजू उचलून धरणं आणि दुसऱ्याला चिरडणं हे उद्दिष्ट झाल्यासारखं दिसतं. आणि याचमुळे अशा माध्यमांवर जनतेचा विश्वास उरत नाही.
शेवटचा मुद्दा: लोकशाहीची कसोटी
कोणताही पॅनेलिस्ट स्वतःहून चर्चासत्रात जात नाही. त्यांना प्रॉडक्शन टीमने बोलावलं असतं. त्यांच्या वेळेचं बुकिंग झालेलं असतं. पण काही अँकर्स व्यक्तिशः आकस ठेवून, विरोधी पक्षातील प्रवक्त्यांचा माईक बंद करतात किंवा त्यांना थांबवून टाकतात.जेव्हा लोकशाहीत “सत्य” बोलणाऱ्याला दाबून टाकलं जातं, त्याला चॅनल्सवर स्थान दिलं जात नाही, तेव्हा ती केवळ माध्यमांची अधोगती नसून, लोकशाहीच्या संकल्पनेवरचं मोठं संकट असतं.आज जे या तिन्ही युवतींसोबत घडतंय, ते सर्वांसाठीच धोक्याचं इशारा आहे. कारण जेव्हा “सत्य” ऐकणं बंद केलं जातं, तेव्हा “फक्त सत्ता” बोलते आणि लोकशाही गप्प होते.लोकशाहीचं आरसाच मळलेला असेल, तर सत्याला प्रतिबिंबात जागा कुठून मिळणार?

