नांदेड,(प्रतिनिधी)- – गणेश चतुर्थीच्या सूर्योदयापूर्वी रात्री नांदेडहून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या १७४१७ क्रमांकाच्या तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याच्या बातम्या काही वर्तमान पत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणताही दरोड्याचा प्रकार घडलेला नसून, केवळ एक चोरीची घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही घटना २६ ते २७ ऑगस्टच्या दरम्यान पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. एस-८ क्रमांकाच्या शयनयान डब्यातील ९ क्रमांकाच्या सीटवर प्रवास करणारे डी. मुरली कृष्णा (रा. स्टेशन यादगीर, कर्नाटक) यांची हॅन्डबॅग चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी साईनगर शिर्डी येथे पोहोचल्यावर दिली. त्यांच्या तक्रारीनुसार बॅगेत सोन्याचे दागिने, मोबाईल, घड्याळ आणि रोख रक्कम मिळून सुमारे १ लाख ८३ हजार रुपये किमतीचा ऐवज होता.ही तक्रार सुरुवातीला मनमाड पोलिस ठाण्यात ‘शून्य क्रमांक’ म्हणून नोंदविण्यात आली. त्यानंतर ती नांदेड जीआरपीकडे (रेल्वे पोलीस) वर्ग करण्यात आली. नांदेड रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५(सी) नुसार गुन्हा क्रमांक ४५३/२०२५ प्रमाणे नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मात्र काही वृत्तवाहिन्यांनी या चोरीच्या घटनेला ‘दरोडा’ असे स्वरूप देऊन अतिरंजित बातम्या प्रसिद्ध केल्या. चोरीची घटना नक्कीच झाली आहे, मात्र कोणतीही जबरदस्ती, युवकांद्वारे लुट किंवा चाकूचा धाक दाखवण्यात आलेला नाही, हे तपासात स्पष्ट झाले आहे.तपासातील प्राथमिक माहितीप्रमाणे, प्रवाशाच्या हाती चोरी कधी झाली हे स्पष्ट नाही. गाडी पूर्णा स्थानक ओलांडून परभणी स्थानकात पोहोचली तेव्हा ती फारसा वेळ थांबलेली नव्हती, त्यामुळे कुठल्याही मोठ्या प्रकाराचे काही कृत्य घडल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे ही गाडी २७ ऑगस्ट रोजी फक्त अर्धा तास उशिराने शिर्डीला पोहोचली होती.
नांदेड जीआरपीचे कार्यक्षेत्र ४७७ किमी आहे. येथे फक्त ४ अधिकारी व ४५ पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. ६ आऊटपोस्ट नांदेड पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत आहेत. वर्षभरात येथे सरासरी ८०० ते ८५० गुन्हे नोंदवले जातात. या तुलनेत असलेले मनुष्यबळ अत्यल्प आहे, याकडे शासनाचे लक्ष जाणे आवश्यक आहे.नांदेड पोलिस ठाण्याला निरीक्षक पद मंजूर असले तरी, सध्या तेथे कोणीही स्थायी पोलीस निरीक्षक नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ मागील एक वर्षापासून अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत.
आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) रेल्वेतील कायदा सुव्यवस्थेसाठी जबाबदार असली तरी, प्रवाशांच्या अनेक गैरसमजुतीमुळे जीआरपी पोलिसांवर अनावश्यक ताण येतो. अशा परिस्थितीत पत्रकारांनीही कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तथ्यांची शहानिशा करणे आवश्यक आहे.केवळ एका प्रवाशाने दिलेली चोरीची तक्रार ‘दरोडा’ म्हणून सादर करणे हे पत्रकारितेच्या नैतिकतेला बाधक आहे. पत्रकारांनी अचूक माहिती घेतल्याशिवाय अशा प्रकारच्या अतिरंजित बातम्यांचे प्रसारण टाळावे, अन्यथा अशा अफवा समाजात भीती पसरवू शकतात.आम्ही प्रसिद्ध केलेली बातमी ही बातमी तथ्यांवर आधारित असून, अधिकृत पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्ष समोर येईल.
