नांदेड(प्रतिनिधी)-30 जून रोजी सायंकाळी 7.40 वाजता पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केलेल्या बिनतारी संदेशानुसार रात्री 8 वाजता अर्थात 20 मिनिटात 30 मे रोजी करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्यातील पोलीस अंमलदार आणि त्यानंतर 30 जून 2025 पर्यंत विनंतीवरुन करण्यात आलेल्या बदल्यातील पोलीस अंमलदारांना रात्री 8 वाजता कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.
पोलीस विभागातील बदल्या हा विषय एक खास विषय आहे. 5 वर्ष एका ठिकाणी सेवा दिल्यानंतर पोलीस अंमलदारांना बदल्या मिळतात. 2024 मध्ये बदल्या झालेले पोलीस अंमलदार 2025 मध्ये नवीन बदलीच्या ठिकाणी हजर झाले. त्यानंतर काही दिवसांमध्ये पुन्हा त्यांना विनंतीनुसार पहिल्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती मिळाली. पोलीस अधिक्षकांनी लिहिलेल्या शब्दांप्रमाणे काही पोलीस अंमलदारांच्या बदल्या विनंतीनुसार केल्या. परंतू त्यासंदर्भाने वेगळ्याच चर्चा होत आहेत.
नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक नामांकित नेते आणि त्यांचे स्विय सहाय्यक यांच्या दबावामुळे त्यांच्या विनंतीबदल्या करण्यात आल्या अशी चर्चा पोलीस दलात सुरु आहे. विनंती बदल्यामध्ये प्रत्येक पोलीस अंमलदाराचा वेगळा स्वतंत्र आदेश जारी झाला. त्यात काही जणांनी खाजगी लोकांच्या भाकरीवर तुप टाकल्याची चर्चा सुरू आहे. पण कोणाच्याही दबावामुळे बदल्या झाल्या असतील तरी प्रशासन तर प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिक्षकांनाच चालवायचे असते. हा बिनतारी संदेश जावक क्रमांक 1390/2025 प्रमाणे जारी झालेला आहे.झालेल्या बदल्यांमध्ये काही जणांच्या एका महिन्यात तिन बदल्या झाल्या आहेत आणि अजूनही त्यांचे मन भरलेले नाहीत आणि अजूनही ते चौथ्या बदलीच्या तयारीत आहेत. अशा पध्दतीचा हा बदल्यांचा खेळ सुरू आहे.
एलसीबीच्या आठ जागांसाठी शर्यत
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस अंमलदार घेतांना एका मोठा आलेख तयार करण्यात आला. त्या आलेखात त्या पोलीस अंमलदाराच्या प्रभारी अधिकाऱ्याने आणि उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेले गुण, त्यांनी दिलेली लेखी परिक्षा त्यातील गुण, त्यांच्या सेवा पटात असलेल्या नोंदीप्रमाणे गुण आणि सर्वात शेवटी मुलाखतीचे गुण अशा चार स्तरांच्या परिक्षेमधून स्थानिक गुन्हा शाखेत पोलीसांची निवड करण्यात आली. परंतू आजही स्थानिक गुन्हा शाखेत आठ पोलीस अंमलदारांच्या जागा शिल्लक आहेत आणि त्यासाठी स्पर्धा लागली आहे. कोणी वेगवेगळ्या पध्दतीने मोठ-मोठ्या लोकांना सांगत आहेत. कोणी पोलीस अंमलदार आपल्याच पोलीस दलातील बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहेत. काही पोलीस अंमलदार पोलीस अधिक्षकांना छोट्या छोट्या माहिती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच पोलीस दलातील बदल्यांना विशेष महत्व आहे. नांदेडमध्येच हे घडत आहे असे काही नाही. राज्य शासन सुध्दा असेच एक-एक पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश काढून त्यांच्या बदल्या करत आहेत.
बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ; स्थानिक गुन्हा शाखेंच्या आठ जागांसाठी लागली रेस
