नांदेड – सचखंड गुरूद्वाऱ्यात १४ एप्रिल रोजी पारंपरिक खालसा पंथ साजना दीवस (स्थापना दिवस )व वैशाखी महल्ला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात देश-विदेशातून तसेच स्थानिक परिसरातून आलेल्या हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी सकाळी पंज प्यारे यांच्या हस्ते बाणीचे पठण करून अमृत तयार करण्यात आले. त्यानंतर शेकडो सिक्ख धर्मीय अनुयायांना सिक्ख मर्यादेनुसार अमृतपान (पाजवून ) देऊन खालसा पंथाची दीक्षा देण्यात आली. गेल्या चार पाच दिवसा पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री रैन सवाई कीर्तन, कथा, श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे अखंड पाठ तसेच लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. गुरूद्वारा गेट क्रमांक ५ समोर भुजंगी सेवक जत्थ्याच्या वतीने आयोजित पाच दिवसीय पाठ, कीर्तन व कथांचा समारोपही पार पडला. यानंतर हजारो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला. १५ एप्रिल रोजी सहाय्यक जत्थेदार (पुजारी) भाई राम सिंघ जी यांच्या अरदास केल्या नंतर वैशाखी महल्ल्याची सुरुवात झाली. या भव्य मिरवणुकीत संचखड गुरूद्वाऱ्याचा ऐतिहासिक निशान साहिब तसेच परिसरातील विविध गुरूद्वाऱ्यांचे निशान साहिब सहभागी झाले होते. “बोले सो निहाल, सत् श्री अकाल”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे सोने व चांदीच्या अलंकारांनी सजवलेले गुरु महाराजांचे घोडे होते. या घोड्या व्यतिरिक्त एका घोड्यावर नगारची सिंघ बसून पारंपरिक नगारा वाजवत होता, ज्यामुळे संपूर्ण वातावरण अधिक दिमाखदार व उत्साहपूर्ण झाले. तसेच मिरवणुकीत कीर्तनी जत्थे, वारकरी संप्रदायाची भजन मंडळे, ढोल-ताशा पथके तसेच गतका जत्थ्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा आदी कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर केली. ही मिरवणूक गुरूद्वारा गेट क्रमांक १ पासून हनुमान मंदिर मार्गे, संत बाबा निधान सिंघ जी चौक (गुरूद्वारा चौक), महावीर चौकजवळील हल्लाबोल चौकापर्यंत पोहोचली. तेथे अरदास करण्यात आल्यानंतर हल्लाबोल बोले सो निहाल सत् श्री अकाल च्या गजरात निशान साहीब घेऊन निशानची सिंघ जी व घोडे हातात खुल्या तलवारी व शत्रै घेऊन भाविकांनी पारंपरिक उत्साहात जोरात पळत पुढील प्रवास सुरू ठेवला. हल्लाबोल चौक ते चिख्खलवाडीपर्यंत धाव घेतल्यानंतर तेथे पोहोचल्यावर मार्गातील अनेक भाविकांनी आपल्या घरासमोर निशान साहिबाची आरती ओवाळून मिरवणुकीचे स्वागत केले. यानंतर मिरवणूक बावली साहिब येथे पोहोचली, जिथे थंड पेये व लंगरची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. तेथे बाणीचे पाठ व कीर्तन झाल्यानंतर मिरवणूक हिंगोली गेट, बाफना रोड, अबचलनगर मार्गे पुन्हा संचखड गुरूद्वाऱ्यात परतली. मिरवणूक गुरूद्वाऱ्यात दाखल झाल्यानंतर पारंपरिक मर्यादेनुसार मुख्य जत्थेदार संत बाबा भाई कुलवंत सिंघ जी यांच्या हस्ते सर्व निशानची सिंघ साहिबांचे पाय पाण्याने धुऊन आरती व ओवाळणी करण्यात आली. विशेष म्हणजे संचखड गुरूद्वाऱ्यात वर्षभरात दीपावली, होळी, दसरा आणि वैशाखी असे चार प्रमुख महल्ले काढले जातात. यापैकी वैशाखी महल्ल्याला विशेष धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असून यंदाही हा उत्सव मोठ्या भक्तिभावात, शिस्तीत आणि अभूतपूर्व भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. Kanthak Suryatal Post Views: 627 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आता पवन खेडाला अटक करण्यासाठी आसाम पोलिसांना मोकळीक फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी