नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजत गुण असतात आणि तो आपल्या जीवनात काय करतोय यापेक्षा आपल्या गुणांना सांभाळण्यात सुध्दा तो लक्ष देत असतो. असाच एक व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलात आहे. तो सध्या परभणी जिल्ह्याच्या पाथरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत.त्याचे नाव पोलीस निरिक्षक महेश जी.लांडगे असे आहे. आपल्या शब्दातून त्यांनी विठू माऊलीची जी कविता बनवली त्यात गायक आणि संगित भूषण काटकर यांनी दिले आहे आणि एक सुंदर गित सध्या सामाजिक माध्यमांवर ऐकले जात आहे.
आपल्यात असलेल्या कणागुणांना महेश लांडगे यांनी पोलीस दलात असतांना सांभाळले ही सर्वात जास्त महत्वाची बाब आहे. ज्या विभागात लोकांना जेवण करण्यासाठी वेळ मिळत नाही, अनेकदा रस्त्यावर रात्र काढावी लागते, चांगले काम करून सुध्दा वरिष्ठ अधिकारी नाराजच असतात, कनिष्ठ अधिकाऱ्यांना कितीही सवलती दिल्या तरी ते अपेक्षीत काम करत नाहीत अशा विभागात असणाऱ्या महेश लांडगे यांनी विठू माऊली ही कविता लिहिली आहे. या अगोदर सुध्दा त्यांनी एक कविता संग्रह प्रकाशित केला आहे. त्यात जीवनाच्या प्रत्येक भागावर प्रकाश टाकलेला आहे.
वाचकांच्या सोयीसाठी पोलीस निरिक्षक महेश लांडगे यांनी लिहिलेली विठु माऊली ही कविता आम्ही प्रसिध्द करत आहोत.
” विठ्ठल माऊली ”
ज्ञानाच्या हातून/ मिळाली माऊली/
देईन सावली/ जीवनात//
विठ्ठल रुक्मिणी/ शोभे लई भारी/
अखंड निवारी/ संकटास//
युगे अठ्ठावीस/ स्थिर ती माऊली/
भक्तीची पालवी/ भिमाकाठी//
मुखी एक काम/ विठ्ठलाचे नाम/
पंढरीच धाम/ माझ्यासाठी//
उंचावली मान/झेंडा हाती ताठ/
दिंडी चाले वाट/पंढरीची//
विठ्ठल माऊली/ श्वासात धावली/
अखंड राऊळी/ हृदयात//
✍️ महेश लांडगे
पोलीस निरीक्षक, परभणी