कोणताही राजकीय पक्ष, कोणतीही संस्था, कोणताही समुदाय, कोणतेही संघटन कोणीही असे करत नाही, जे भारतीय जनता पार्टी (भाजप) करत आहे. भाजपच्या सध्याच्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाचे संस्थापक नेते आणि मूल्यांनाच आज नाकारण्याचा प्रयत्न केला आहे.
ते म्हणतात, “आपण चुकीचे लिहिले आहे, आणि आता आम्ही ते दुरुस्त करणार आहोत.” पण काय दुरुस्त करणार? संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द त्यांना त्रासदायक वाटतात. 42 व्या संविधान दुरुस्तीत, आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी ‘धर्मनिरपेक्षता’ व ‘समाजवाद’ हे शब्द संविधानात समाविष्ट केले. त्याचप्रमाणे ‘राष्ट्रीय एकता’ आणि ‘अखंडता’ हे शब्दही तेव्हा समाविष्ट झाले. मग प्रश्न असा आहे आज भाजप ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन शब्द हटवू इच्छिते, उद्या ‘राष्ट्रीय एकता’ आणि ‘अखंडता’ हे शब्दही हटवणार काय?पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या शब्दांबद्दल आपला विरोध मांडत होता, आता भाजपचे नेतेही त्याच सुरात बोलत आहेत. याचा अर्थ असा की, आजच्या भाजपच्या मते, त्यांचेच जुने नेते चुकले होते, कारण त्यांनी ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ यांना मान्यता दिली होती. आता ही मंडळी तो “चुका” दुरुस्त करू पाहत आहेत!
सर्वप्रथम, भाजपने स्वतःचे पक्ष संविधान वाचावे. त्यात ‘धर्मनिरपेक्षता’ व ‘समाजवाद’ या मूल्यांचा स्पष्ट उल्लेख आहे.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, RSSचे दत्तात्रय होसबोले , तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी संविधान बदलण्याचे विधान केले. पण त्यांनी भाजपचे पक्ष संविधान वाचलेच नसावे, असेच त्यांचे वक्तव्य ऐकून वाटते. त्यांना वेळच नाही. कधी ते हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करण्यात व्यस्त असतात, कधी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्यात, कधी आरक्षण काढून टाकण्याच्या कार्यक्रमात. त्यांना स्वतःच्या पक्षाचे संविधान वाचायला वेळ कुठून मिळणार?
पक्षाचे संविधान वाचायला वेळ मिळावा, यासाठीच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला पाहिजे. कारण हे स्पष्ट दिसते की, नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी हे संविधान वाचलेलेच नाही. वाचले असते, तर शिवराज सिंह चौहान, जितेंद्र सिंह, जगदीप धनखड यांना त्यांनी स्पष्ट सांगितले असते की, “धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द तुमच्या पक्षाच्या संविधानात आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही.” भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘आमची पार्टी’ या विभागात ‘संविधान’ हा पर्याय आहे. त्यात ‘सर्वधर्मसमभाव’, ‘समाजवाद’, ‘गांधीवादी विचारसरणी’, ‘लोकशाही समाजव्यवस्था’, ‘शोषणमुक्त समाजनिर्मिती’ यांचा स्पष्ट उल्लेख आहे.
संविधान म्हणजे केवळ एका पुस्तिकेतील शब्द नव्हेत, तर पक्षाचे मार्गदर्शन मूल्य आहे.
त्यांचे ३५-४० पानांचे संविधान सार्वजनिक आहे, आणि त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की भारतीय जनता पार्टी ही सकारात्मक पंथनिरपेक्षतेवर (सर्वधर्मसमभाव) आणि समाजवादावर विश्वास ठेवते. सदस्यत्व घेताना जी प्रतिज्ञा घेतली जाते, त्यातसुद्धा ‘धर्मनिरपेक्षता’, ‘समाजवाद’ आणि ‘गांधीजींच्या विचारांवर विश्वास’ यांचा उल्लेख आहे. मग हेच शब्द भारतीय संविधानातून हटवायची मागणी भाजप कशी करू शकते?भाजपच्या काही नेत्यांना ‘अशिक्षित’ म्हटले जात आहे, याचे कारण हेच,स्वतःच्या पक्षाचे मूलतत्त्वही माहित नाहीत. मग ते देशाचे संविधान बदलायच्या गोष्टी करतात! ही परिस्थिती अत्यंत हास्यास्पद आणि गंभीर आहे.पत्रकार नीरज कुमार सांगतात, “ज्यांना स्वतःच्या पक्षाचे संविधान वाचण्याची वेळ नाही, त्यांना देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार तरी आहे का?” आजच्या परिस्थितीत भाजपने सर्वप्रथम आपलेच संविधान वाचावे, समजून घ्यावे आणि त्यावर अभ्यासक्रम चालवावा. अन्यथा, उद्या त्यांच्यावर केवळ टीका नव्हे, तर उपहास आणि सामाजिक अविश्वासाचे वादळ कोसळेल.