एनआयएने उघड केलं वास्तव: सर्व अतिरेकी पाकिस्तानी, स्थानिकांची फक्त मदत
२२ एप्रिल रोजी पहलगाम, काश्मीर येथे अतिरेक्यांनी हल्ला करून अनेक भारतीय नागरिकांचा बळी घेतला. त्या वेळी सरकारने अत्यंत घाईगडबडीत अतिरेक्यांची नावे व त्यांच्या रेखाचित्रे जाहीर केली. मात्र, दोन महिन्यांनंतर, म्हणजेच ६२ दिवसांनी, ‘एनआयए’च्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ती माहिती चुकीची होती.जम्मू-काश्मीर पोलिसांनी ज्या संशयित अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती, त्यांच्याच आधारावर हेच हल्लेखोर असल्याचे देशाला सांगितले गेले. मात्र आता स्पष्ट झाले आहे की ती रेखाचित्रे पूर्णतः चुकीची होती. एनआयएने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की त्या हल्ल्यात सहभागी असलेले अतिरेकी हे सर्व पाकिस्तानातून आलेले होते,स्थानिक कुणीही नव्हता.
हल्ल्यानंतर दोन दिवसांत सरकारकडून जी रेखाचित्रे दाखवली गेली, त्यामध्ये एका स्थानिक व्यक्तीचाही उल्लेख करण्यात आला होता. मात्र, ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये आलेल्या अहवालानुसार, जे रेखाचित्रे अतिरेकी म्हणून दाखवण्यात आली होती, त्यांचा खऱ्या अतिरेक्यांशी कोणताही संबंध नव्हता. एनआयएने स्पष्टपणे सांगितले आहे की ती रेखाचित्रे चुकीची होती.गेल्या दहा वर्षांपासून ‘देश सुरक्षित हातात आहे’ हे जनतेच्या मनावर ठसवले जात आहे. मात्र, या प्रकारातून दिसून येते की सरकारकडे ना ठोस पुरावे होते, ना खात्रीलायक माहिती. मग अशा परिस्थितीत त्या व्यक्तींना अतिरेकी म्हणून घोषित करण्याची घाई सरकारने का केली, हा गंभीर प्रश्न आहे.जम्मू-काश्मीर हे आता केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जवळपास २०० लोकांची चौकशी करण्यात आली व दोघांना अटक करण्यात आली. एनआयएने सांगितले आहे की अटक करण्यात आलेले हे दोन जण अतिरेक्यांचे आश्रयदाते होते आणि त्यांच्या माहितीवरूनच सत्य समोर आले.
हल्ल्यापूर्वी जुनेद नावाचा एक अतिरेकी ठार मारण्यात आला. त्याच्या फोनमधील काही फोटो पाहून पोलिसांनी अंदाज बांधला की हेच पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी असावेत. त्यानंतर लगेचच रेखाचित्रे जारी करण्यात आली, मात्र कोणतीही पडताळणी झाली नव्हती.परवेझ आणि अहमदनगर येथील पैलवान जवळील हिल पार्कमध्ये राहणाऱ्या दोन भावांना अटक करण्यात आली. चौकशीमध्ये समोर आले की अतिरेकी वेगळेच होते आणि त्यांनी बंदुकीच्या धाकाने व पैशांचे आमिष दाखवून त्या घरी निवारा घेतला होता. हे तिघे अतिरेकी पाकिस्तानचे होते.पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या रेखाचित्रांमध्ये हाशिम मुल्ला अलीभाई (पाकिस्तान) आणि आदिल हुसेन ठोकर (काश्मीर) यांचा उल्लेख होता. मात्र, आता स्पष्ट झाले आहे की त्या नावांचा या हल्ल्याशी काही संबंध नव्हता. एनआयएच्या पत्रकार परिषदेनुसार, हे तिघे अतिरेकी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे सदस्य होते.एनआयए स्वतः सांगत आहे की जनतेला जे दाखवले गेले, ते अतिरेकी नव्हतेच. पण ६२ दिवसांत ही खरी माहिती कशी बाहेर आली आणि आधी चुकीचे रेखाचित्र कसे प्रसिद्ध झाले याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. आजही हे अतिरेकी पाकिस्तानातून आले होते, पण ते कुठे गेले, याचा ठावठिकाणा नाही.
ही गुप्तचर यंत्रणांची गंभीर अपयशाची घटना आहे. विशेष म्हणजे चार-पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम याच परिसरात होणार होता, तरीही हे अतिरेकी त्या भागात पोहोचू शकले. हल्ला झालेलं पहलगाम हे सीमेवरील नव्हे, तर काश्मीरच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे हा हल्ला अधिकच चिंताजनक ठरतो.अनेकजण म्हणतात की काश्मिरी लोक अतिरेक्यांना मदत करतात. मात्र, यामध्ये अतिरेक्यांना अन्न व निवारा दिला गेला असला तरी त्यांनीच नंतर या माहितीची उघडकीस आणली, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर जनतेने विचार केला पाहिजे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच.‘UAPA’ कायद्यातील कलम १९ नुसार, जर कोणी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे अतिरेक्यांना मदत केली, तर त्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. ती शिक्षा त्या स्थानिकांना न्यायालयातील पुराव्यांच्या आधारावर मिळेलच.मात्र, ज्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पडताळणी न करता चुकीची रेखाचित्रे प्रसिद्ध केली, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा या चुका पुन्हा घडतील.२०१८ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबतही अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या हल्ल्यासाठी वापरले गेलेले RDX भारतात कसे आले, याचे उत्तर आजही मिळालेले नाही. पहलगाम हल्ल्यालाही ६२ दिवस झाले असले तरी अनेक मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.त्या तीन अतिरेक्यांची नावे देशासमोर यायला हवीत. वाचकांनी या सर्व गोष्टींचा विचार करून मत मांडावे, हीच विनंती.