नांदेड (प्रतिनिधी)- वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कार यांचा अनोखा संगम रविवारी (दि. ३१ मे) नांदेडमध्ये पाहायला मिळणार आहे. शहरातील श्रीशंकरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट युनिटचे उद्घाटन ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. स्वप्नील चक्रवार यांनी आपल्या आई-वडिलांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधेच्या शुभारंभामागील ही भावनिक आणि प्रेरणादायी बाजू विशेष लक्ष वेधून घेत आहे. डॉ. स्वप्नील चक्रवार यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणापासून ते आजवरच्या यशस्वी कारकिर्दीपर्यंतचा प्रवास आठवताना, जीवनात जे काही साध्य करता आले, ते आई-वडिलांच्या कष्ट, त्याग, संस्कार आणि आशीर्वादामुळेच शक्य झाले,अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक मान्यवराऐवजी आपल्या आई-वडिलांनाच प्रमुख स्थान देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. या नव्या रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट युनिटमुळे नांदेड आणि परिसरातील रुग्णांना महानगरांमध्ये जावे न लागता अत्याधुनिक गुडघा व हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेमध्ये अधिक अचूकता साधता येते. परिणामी रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी कालावधीचा रुग्णालयीन मुक्काम आणि जलद पुनर्वसनाचा लाभ मिळतो. तसेच प्रत्यारोपण अधिक योग्य प्रकारे बसविणे शक्य होत असल्याने त्याचे आयुष्य वाढण्यासही मदत होते. या युनिटचे उद्घाटन डॉ. अशोक नारायण चक्रवार आणि सौ. विना अशोक चक्रवार यांच्या हस्ते ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रांतील नागरिक आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.श्री शंकरा सुपरस्पेसिऍलिटी हा दवाखाना बोरबन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड येथे स्थित आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच कुटुंबातील ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जात आहे. आधुनिक वैद्यकीय सेवांचा नवा अध्याय सुरू करताना आई-वडिलांच्या आशीर्वादाला सर्वोच्च स्थान देण्याची डॉ. स्वप्नील चक्रवार,डॉ.अमेय चक्रवार आणि डॉ. माधुरी स्वप्नील चक्रवार यांची भूमिका ही केवळ वैयक्तिक भावना नसून समाजासाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. Kanthak Suryatal Post Views: 794 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलिस दलात हालचाल : चारशेहून अधिक सहायक निरीक्षकांची नवीन पोस्टिंग शहाजी उमाप यांच्या जनसुनावणीत ५५ तक्रारीचा निकाल