आजच्या जागतिक परिस्थितीत, इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला खोमेनी यांचे आभार मानणे संपूर्ण जगासाठी आवश्यक झाले आहे. कारण त्यांनी केवळ इराणसाठीच नव्हे, तर अमेरिकेच्या जुलमाला कंटाळलेल्या प्रत्येक राष्ट्रासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी लढा दिला आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे.
प्रत्येक भारतीय नागरिक, तो कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा असो, त्याने आयतुल्ला खोमेनी यांच्या धैर्याला सलाम केला पाहिजे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्पसारख्या मग्रूर नेत्याची अहंकारभंग केलेला आहे. आपण हे मानो किंवा न मानो, हे सत्य आहे की आयतुल्ला खोमेनी हे इतिहासातील महान आणि शूर योद्ध्यांपैकी एक ठरले आहेत.त्यांच्याविरोधात जगातील अनेक शक्ती उभ्या असताना, त्यांनी अमेरिका व इस्रायलसारख्या बलाढ्य देशांना चोख प्रत्युत्तर दिले. ज्या इस्रायलने झाडांची पाने तोडावी तशी मानवहानी केली होती, त्या देशाचे नागरिक आज आपल्या उद्ध्वस्त घरांकडे पाहून पश्चात्ताप करत आहेत. त्यांना आठवत असेल की इराणशी शत्रुत्व कशा प्रकारे भयानक ठरले.
ही लढाई इस्रायलविरुद्ध नव्हती, तर थेट अमेरिकेविरुद्ध होती. इराणला गाजासारखा दुर्बल समजण्याची चूक इस्रायलने केली. गाजामध्ये नेतृत्व नव्हते, पण इराणमध्ये आयतुल्ला खोमेनी होते. त्यांनी सिद्ध केले की केवळ शस्त्रास्त्रांच्या बळावर युद्ध जिंकता येत नाही , जिद्द, आत्मसन्मान आणि राष्ट्रप्रेम हाच खरा विजयाचा मार्ग असतो.त्यांनी आधीच ठरवले होते, कोणतीही अडचण आली, तरी आम्ही मागे हटणार नाही. अशी निर्धारपूर्वक सुरुवातच कोणत्याही लढाईत अर्धा विजय मिळवून देते. संकटांमध्ये नवे मार्ग सापडतात – पण तेव्हाच, जेव्हा नेता खरोखर धैर्यशील आणि दूरदृष्टीचा असतो. मोदींसारखा नव्हे, ज्यांनी ट्रम्पच्या एका आदेशाला शेळीसारखी मान झुकवली.
खोमेनी कधीही धमक्यांना घाबरले नाहीत. चारही बाजूंनी शत्रू असतानाही त्यांनी आपली सेना युद्धभूमीतच ठेवली. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी कधीही सैन्याचा वापर केला नाही. म्हणूनच आज अमेरिका इराणसमोर झुकते आहे. कारण त्यांच्या नेतृत्वात खोमेनीसारखा दृढनिश्चयी नेता आहे.खोमेनींनी जगाला दाखवून दिले की जर एखाद्या राष्ट्राने आपल्या मूलभूत मूल्यांसाठी उभं राहायचं ठरवलं, तर कोणतीही सुपरपॉवर त्याला गुडघ्यावर आणू शकत नाही. ‘विश्वगुरू’ ही पदवी आयटी सेलने किंवा मीडिया प्रचाराने मिळत नाही. ती मिळते नैतिक विचारसरणी, लोकहितासाठी केलेल्या निर्णायक कृतीतून.
खरे विश्वनेते सैन्याच्या शौर्याचा राजकीय बाजार करत नाहीत, तर नैतिकतेचे उच्च मानदंड जगासमोर ठेवतात. भविष्यात जेव्हा जग खऱ्या विश्वनेत्यांबद्दल चर्चा करेल, तेव्हा आयतुल्ला खोमेनी यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मोदी आणि कॉमेडी यामधला फरक इथे स्पष्ट होतो.भारतीय सैन्य पाकिस्तानवर विजय मिळवू शकत असतानाही मोदींनी त्यांना परत बोलावले. इराणने अमेरिकेपेक्षा कितीतरी कमी ताकद असूनही, संपूर्ण इस्रायल अंधारात बुडवला. हे काही साधं काम नव्हतं.इराणने केवळ शस्त्राने नव्हे, तर आत्मसन्मान, संयम आणि राष्ट्रप्रेमाच्या बळावर लढा दिला. मोठ्या सामर्थ्याच्या विरोधात उभा राहण्यासाठी हृदयात राष्ट्रासाठी आगीसारखं प्रेम असावं लागतं, तेच खोमेनींकडे होतं.विश्वनेत्यांची ओळख ही त्यांच्या कृतीतून ठरते, प्रचारातून नव्हे. जे नेते युद्धाच्या काळातही विरोधकांना कमी लेखण्यात गुंतलेले असतात, जे देशाच्या संवेदनशील परिस्थितीचाही राजकारणासाठी वापर करतात, ते कधीच विश्वनेते ठरू शकत नाहीत.जे पंतप्रधान सैन्य विधवांना, महिला अधिकाऱ्यांना अपशब्द बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरू शकत नाहीत, ते नायक नसतात , ते केवळ खुर्चीसाठी धडपडणारे असतात.डोनाल्ड ट्रम्पने “मीच युद्धविराम केला” असं सतरा वेळा सांगत मोदींना जागतिक व्यासपीठावर लज्जास्पद स्थितीत आणलं, तर दुसरीकडे खोमेनींनी त्यांच्या घोषणेनंतरही अमेरिकन सैन्य ठिकाणांवर प्रत्युत्तर देत सिद्ध केलं की “तू आमचा भाग्यविधाता नाहीस”.इराणने अमेरिका, चीन, रशिया आणि तटस्थ देशांना हा संदेश दिला. जर जगात खरा समतोल हवा असेल, तर अमेरिका केंद्रस्थानी असलेली व्यवस्था चालणार नाही.
खरा मुद्दा इराण नव्हता – खरा मुद्दा होता गाझा.
जर ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा असेल, तर त्यांना फिलिस्तिनी समप्रभुत्तेचा सन्मान करावा लागेल. इस्रायलने गाझा आणि फिलिस्तिनी नागरिकांवर केलेल्या अन्यायाबद्दल सार्वजनिक माफी मागावी लागेल. तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही.
ज्या देशांनी या लढाईबाबत आपले स्पष्ट मत मांडले नाही, त्यांना इतिहासात स्थान मिळणार नाही. रणांगणातून पळून जाणं महत्त्वाचं नाही – मानवतेच्या विरुद्ध मौन बाळगणं हाच खरा गुन्हा आहे.पत्रकार नवीन कुमार म्हणतात –”जोपर्यंत बारूद फेकणाऱ्यांच्या हातात भाकरीच्या टोपल्या येणार नाहीत,तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील.”