शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग महत्वाचा-राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

नांदेड:- योग ही भारताला मिळालेली प्राचीन देगणी असून, ती शरीर व मनाला निरोगी ठेवते. आपले आरोग्य चांगले असेल तर देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी हातभार लागतो. योगामुळे मनुष्याचे शरीर व मन निरोगी राहते, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

आज ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भक्ती लॉन्स येथे पतजंली योग पिठ यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, आदींची उपस्थिती होती.

 

आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार आज ठिकठिकाणी योगा दिवस साजरा करण्यात आला. योग ही भारताला मिळालेली देणगी असून यामुळे शरीर व मन निरोगी ठेवते. कोरोना नंतर तर योगाचे महत्व सर्व जगाला पटले असून हम फिट तो इंडिया फिट हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचा नारा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ या असे आवाहनही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. तसेच योगा हा प्रत्येक घरा-घरात झाला पाहिजे. आपल्या देशाची प्रगती साधायची असेल तर योगा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पंतजली योग पिठाच्या योग प्रशिक्षकांनी उपस्थितांकडून विविध आसने करुन घेतली. या योग दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांसह महिला, मुले यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!