राजकीय अपयशाचा आगीत होरपळलेला अध्याय : अहमदाबाद विमान दुर्घटना

मल्लिका साराभाई यांची एक पोस्ट आम्हाला प्राप्त झाली आहे. मल्लिका साराभाई या जगप्रसिद्ध कुचीपुडी आणि भरतनाट्यम नृत्यांगना असून, त्यांचे वडील विक्रम साराभाई हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक होते. त्या सध्या अहमदाबादमध्ये राहतात.मल्लिका साराभाई यांनी लिहिलेली पोस्ट ही केवळ एक भावना नव्हे, तर सत्ताधाऱ्यांना झणझणीत सवाल करणारी साक्ष आहे. आम्ही ती जनता आणि वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण विषय फक्त एका विमान अपघाताचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाचा आहे.

विमान दुर्घटना : नियती नव्हे, निष्काळजीपणा

ड्रीमलाइनर क्रॅशमध्ये मल्लिका साराभाई नव्हत्या. त्या म्हणतात, “मी फक्त एक दिवस आधीच लंडनहून अहमदाबादला आले होते. पण त्या विमानातले 241 लोक मरण पावले. हे थांबवता येऊ शकलं असतं. ही चूक फक्त एक अपघात नव्हे, ही व्यवस्थेची निष्काळजीपणाची परिसीमा आहे.”

विमानतळ : मृत्यूच्या सावलीत

साराभाई स्पष्ट सांगतात की सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. रनवे अतिशय गर्दीच्या भागात आहे. बफर झोन नाही. चूक झालीच तर ती सुधारण्यासही जागा नाही. सुरक्षिततेची कोणतीही जागा तिथे उरलेली नाही.

सावधतेच्या सूचना आणि सरकारचे दुर्लक्ष

2018 मध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने गुजरात सरकारकडे 29 एकर जागेची मागणी केली होती. त्या जागेवर 350 कुटुंबे राहतात. राजकीय दडपणामुळे ही कुटुंबे हलवली गेली नाहीत. 2019 च्या अहवालात या सर्व त्रुटी स्पष्टपणे नमूद होत्या.

नेतृत्वाचं अपयश आणि प्रश्नांची गरज

या अपघातात एक व्यक्ती वाचली, पण शेकडो लोक मरण पावले. मल्लिका साराभाई सांगतात की, “हा अपघात नव्हता, ही नियोजित असफलता होती.” यंत्रणांनी आधीच आलेल्या अहवालांकडे डोळेझाक केली, निधी दुसरीकडे वळवला गेला, आणि शेवटी अपघात झाला.

ते पुढे म्हणतात, “विजय रूपाणी मुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळात सुरक्षिततेच्या सूचना वारंवार आल्या होत्या. पण त्या दुर्लक्षित केल्या गेल्या. हे अपयश त्यांचंही आहे.”

गुजरात मॉडेल : प्रचार विरुद्ध वास्तव

पत्रकार अशोक वानखेडे म्हणतात की, “गुजरात मॉडेल फसवणूक ठरली आहे.” देशाला विकासाचे स्वप्न दाखवण्यात आलं, पण प्रत्यक्षात लोकांचे जीव धोक्यात टाकले गेले. मल्लिका साराभाई यांचा स्पष्ट आरोप आहे – हा फक्त विमान अपघात नाही, ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाची दाहक साक्ष आहे.

मूक श्रद्धांजली नव्हे, तर संतप्त प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे

मल्लिका साराभाई सांगतात:

“मी ही पोस्ट दुःख व्यक्त करण्यासाठी लिहिलेली नाही. हा माझा संताप आहे. श्रद्धांजली पुरेशी नाही. राग व्यक्त करा. प्रश्न विचारा. नरेंद्र मोदींना, अमित शहा यांना, गुजरात सरकारला, अधिकाऱ्यांना, मीडियाला प्रश्न विचारा.”

“आज ते गेले. उद्या आपली पाळी असू शकते. अपघात थांबवण्याऐवजी आपण पुढच्या अपघाताची वाट पाहतो आहोत का?”

शेवटी : लोकशाहीला जागा व्हा

ही लोकशाही आहे – आणि ती फक्त निवडणुका लढवण्यापुरती नको. ती सुरक्षिततेचे उत्तरदायित्व घेण्यासाठी आहे. आपल्या नेत्यांना फक्त गौरवगाथा ऐकवू नका – त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!