नांदेड – जिल्ह्याचे सुपुत्र आणि १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी श्रीपाद शिरडकर यांची उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदी पदोन्नती झाली आहे. दि. १० जून रोजी उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या मान्यतेने मुख्य सचिव संजय प्रसाद यांनी या पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले, ज्यामुळे नांदेड जिल्ह्यात, शहरात आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.
श्रीपाद शिरडकर हे नांदेड शहरातील वजिराबाद परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या या उत्तर प्रदेश पोलीस दलातील सर्वोच्च पदावरील नियुक्तीचे नांदेडकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. ही केवळ श्रीपाद शिरडकर यांची वैयक्तिक यशोगाथा नसून, संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
श्रीपाद शिरडकर यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत देदीप्यमान राहिला आहे. त्यांनी इयत्ता चौथीला आणि सातवीला शिष्यवृत्ती मिळवली होती, तर बारावीच्या बोर्ड परीक्षेतही त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश केला. त्यांच्या या अथक परिश्रमाचे आणि बुद्धिमत्तेचे फळ आता त्यांना पोलीस दलातील सर्वोच्च पदावर मिळाले आहे.
श्रीपाद शिरडकर यांची आई, निवृत्त शिक्षिका मंदा पांडे आणि वडील, निवृत्त तहसीलदार भगवानराव पंडित यांनी आपल्या मुलाच्या या उत्तुंग यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मुलाच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
श्रीपाद शिरडकर यांच्या पदोन्नत्तीनिमित्त दिगंबर क्षीरसागर, रेणुकादास दीक्षित, डॉ. गोविंद नांदेडे, डॉ. सुनील धोंडगे, ॲड. अमोल सूर्यवंशी, अशोक घोरबांड, विवेक मोरे, व्यंकटेश चौधरी, आदींसह अनेक नांदेडकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाने नांदेडमधील युवा पिढीला प्रेरणा मिळाली आहे आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. श्रीपाद शिरडकर यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे पोलीस दलात काम करत हे स्थान मिळवले आहे, जे सर्वांसाठी आदर्शवत आहे.