पालम,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि परभणी जिल्ह्यातील दोन पोलीस अंमलदार दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणात अडकले आहेत.
दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रारदाराच्या शेतात काही लोक जुगार खेळताना आढळले. या प्रकरणात तक्रारदार आणि त्याचा मित्र यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यांना परभणी येथे स्थानिक गुन्हा शाखेत न नेण्याऐवजी पालम तहसील येथे जामीन मिळावा, यासाठी पोलीस हवालदार येसुरकर यांनी प्रत्येकी 5,000 रुपये, अशा एकूण 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) परभणी यांच्याकडे दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीची पडताळणी 10 जून रोजी करण्यात आली. त्यावेळी पोलीस हवालदार येसुरकर पोलीस ठाण्यात अनुपस्थित नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या मदतनीस पोलीस हवालदार अशोक केदारे यांची भेट घेतली. त्यावेळी केदारे यांनी प्रत्येकी 5,000 रुपये अशी लाच मागणी केली. नंतर तक्रारदार व त्याचा मित्र यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश राजन्ना दोनकलवार यांच्या समोर नेण्यात आले. त्यावेळी दोनकलवार यांनी, “जो बोला है, वो कर दे,” असे म्हणत संमती दर्शवून लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले.
त्यानुसार, प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे एकूण 10,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दिनांक 12 जून रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली. त्या वेळी तक्रारदार व त्याचा मित्र यांना पोलीस ठाणे, पालम (जि. परभणी) येथे पाठवण्यात आले आणि तिथे पोलीस हवालदार येसुरकर यांनी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली.
या कारवाईदरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दोनकलवार, पोलीस हवालदार मल्लारी येसुरकर आणि पोलीस हवालदार अशोक केदारे यांना ताब्यात घेण्यात आले. सतीश दोनकलवार यांच्या कडून एक मोबाईल व ₹2,700, येसुरकर यांच्या कडून एक मोबाईल व ₹700 आणि अशोक केदारे यांच्या कडून एक मोबाईल व काही साहित्य जप्त करण्यात आले.
त्यानंतर दोनकलवार यांच्या पालम येथील तसेच नांदेड जिल्ह्यातील दुंड्रा (ता. किनवट) येथील घराची झडती घेण्यात आली असून तपास सुरू आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 आणि 13 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला ते अधिकारी:
सतीश राजे दोनकलवार (वय 40), सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, पालम.
राजेश राजलिंगम येसुरकर (वय 42), पोलीस हवालदार, बक्कल नं. 325.पोलीस ठाणे, पालम.अशोक भास्कर केदारे (वय 35), पोलीस हवालदार, बक्कल नं. 153.पोलीस ठाणे, पालम.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली, परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर, पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी आणि पोलीस निरीक्षक मनीषा पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.